विश्व भारत ऑनलाईन :
महाराष्ट्रातील मुख्यत्वे मराठवाडा, विदर्भ व पश्विम महाराष्ट्रातील कमी पावसाच्या प्रदेशात चित्ता होता अशी नोंद आहे. विदर्भातील शिकाऱ्यांनी चित्याच्या शिकारी केल्याच्याही नोंदी आहेत. आता हाच चित्ता भारतातील मध्य प्रदेशातील कुनो पालपूर राष्ट्रीय उद्यानात 17 सप्टेंबर रोजी नामीबिया येथून पोहचणार आहे.
भारत सरकारने भारतात पुन्हा चित्ता आणून त्याचे संवर्धन करण्यासाठी ‘चित्ता री-इंट्रोडक्शन’ हा एक महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला. प्रकल्पा अंतर्गत भारताने नामिबियाशी चित्ते मागवण्यासंदर्भात करार करण्यात आला. या अंतर्गत नामिबियातून चित्ते मागवण्यात आले. उद्यानात चित्त्यासाठी खास निवा-याची बांधणी करण्यात आली आहे.
त्यामुळे वन्यजीव प्रेमींना आता लवकरच चित्ता पाहण्याची संधी मिळणार आहे. या चित्त्यांना त्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते चित्त्यांसाठी खास बांधलेल्या निवाऱ्यांमध्ये सोडण्यात येईल, असे राज्याचे वनमंत्री विजय शाह यांनी शनिवारी सांगितले. महत्त्वाकांक्षी चित्ता री-इंट्रोडक्शन प्रकल्पासाठी कुनो पालपूर राष्ट्रीय उद्यानात केलेल्या तयारीची पाहणी केल्यानंतर ते बोलत होते. 17 सप्टेंबर हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस आहे.
नामशेषच्या मार्गांवर
भारतातून 1955 च्या आसपास चित्ता नामशेष झाला होता. 1951 मध्ये आंध्रप्रदेशातील जंगलात शेवटचा जंगली चित्ता दिसल्याची नोंद आहे. एकेकाळी चित्ता हा अफ़्रिका युरेशिया व भारतीय उपखंडातील मोठ्या भूभागावर पसरला होता.भारतातील चित्त्याला अशियाई चित्ता म्हणत. त्याचा भारतात एके काळी मोठ्या भूभागावर वावर होता. परंतु आज केवळ अफ़्रिकेच्या गवताळ प्रदेशापुरते चित्त्याचे स्थान मर्यादित राहिले आहे. याला मुख्य कारण चित्याचे नष्ट झालेले वसतिस्थान हे आहे. चित्त्याचे मुख्य वसतिस्थान जे गवताळ प्रदेश आहे. त्यावर शेती व इतर कारणासाठी मानवी अतिक्रमण झाले. तसेच चित्त्याचे वैशिष्ट्य जे अतिवेग आहे तो चित्त्याच्या प्रगतीत खरेतर मारक ठरला.
संख्या कमी
आशियाई चित्त्याची आज केवळ इराणमध्ये जवळपास पन्नास इतकी संख्या राहिली आहे. अधूनमधून बलुचिस्तानमध्ये चित्ता दिसण्याच्या घटना घडतात.