१०० कोटी द्या…अन्यथा केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या घरी आणि जनसंपर्क कार्यालयात बॉम्बस्फोट करू, अशी धमकी देणारा फोन शनिवारी आला. हा फोन कर्नाटक राज्यातून आला असून ती धमकी कुख्यात डॉन दाऊन इब्राहिमच्या नावावर मागितल्याची माहिती सूत्रांनी दिली. नितीन गडकरी यांच्या नागपूर येथील जनसंपर्क कार्यालयात शनिवारी साडेअकरा ते साडेबारा वाजतादरम्यान सलग तीन धमकीचे फोन आले. त्यामुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.
प्रकरण असे की,केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांच्या खामल्यातील जनसंपर्क कार्यालयात शनिवारी सकाळी ११.२८ मिनिटांनी एक फोन आला. जीतेंद्र शर्मा याने तो फोन उचलला. समोरच्याने थेट दाऊद इब्राहिमचे नाव घेऊन गडकरींनी १०० कोटी रुपयांची खंडणी द्यावी अन्यथा आम्ही भाजपाच्या जनसंपर्क कार्यालयात आणि नितीन गडकरी यांच्या घरी बॉम्बस्फोट करू’ अशी धमकी दिली. खंडणीसाठी फोन आल्यामुळे जितेंद्र शर्मा यांनी गडकरींचे कुटुंबिय आणि खासगी सहायकांना फोन करून माहिती दिली. तसेच भाजपाच्या काही वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनाही माहिती दिली. त्यानंतर १० मिनिटांतच म्हणजे ११.३८ मिनिटांनी दुसरा फोन आला.