न्यूझीलंडमधील एका शेतकरी महिलेने गुजरात सहकारी दूध महासंघाच्या (अमूल दूध) शिष्टमंडळातील दोन सदस्यांवर विनयभंग केल्याचा आरोप केला आहे. यावर तिने तक्रार दाखल केली असून न्यूझीलंड पोलिसांकडून चौकशी सुरू असल्याची माहिती आहे.
प्रकरण जाणून घ्या…
‘द इंडियन एक्सप्रेस’ने न्यूजहबच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, गुजरात सहकारी दूध महासंघाचे शिष्टमंडळ सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर असून त्यांनी १७ एप्रिलरोजी त्यांनी न्यूझीलंडमधील दुध उत्पादक शेतकऱ्यांशी संवाद साधला. या कार्यक्रमाला न्यूझीलंडचे कृषी मंत्री डॅमियन ओ’कॉनर आणि कृषी उपसचिव जो लक्सटन हे दोघे उपस्थित होते. या कार्यक्रमादरम्यान संबंधित शिष्टमंडळातील कर्मचाऱ्यांनी मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करून माझा विनयभंग केला. तसेच माझे फोटो काढले, असा आरोप या महिलेने केला आहे. यासंदर्भात तिने तक्रार दाखल केली असून याप्रकरणाची चौकशी सुरू असल्याची माहिती आहे.
घटना आमच्यासमोर घडली असल्याचं न्यूझीलंडचे कृषी मंत्री डॅमियन ओ’कॉनर आणि कृषी उपसचिव जो लक्सटन यांनी म्हटलं आहे.गुजरात सहकारी दूध महासंघांच्या अधिकाऱ्यांनीही महिलेचे आरोप फेटाळले आहेत. संबंधित महिलेने केलेले आरोप चुकीचे असून अशी कोणतीही घटना घडली नसल्याची प्रतिक्रिया जीसीएमएमएफचे व्यवस्थापकीय संचालक जयेन मेहता यांनी ‘द इंडियन एक्सप्रेस’शी बोलताना दिली. तसेच हे एक षडयंत्र असून काही लोकांकडून स्वत:च्या स्वार्थासाठी भारत आणि न्यूझीलंडमधील भागीदारीच्या प्रक्रियेत अडचणी निर्माण केल्या जात आहेत, असेही ते म्हणाले.