आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांना विविध शस्त्रक्रिया व आजारांवरील उपचारांसाठी मोठा खर्च लागतोय. यावर उपाय म्हणून मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत दिली जाते. यासाठीचा अर्ज कुठे मिळतो,अशा विविध शंका सर्वसामान्यांच्या मनात आहेत. ग्रामीण भागातील जनतेला हा अर्ज मिळवण्यासाठी अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाकडून यावर तोडगा काढण्यात आला असून एका मिसकॉलवर आता निधी मिळणे शक्य होणार आहे. यासाठी ८६५०५६७५६७ हा मोबाइल क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे. या क्रमांकावर मिसकॉल देताच तत्काळ मुख्यमंत्री सहायता निधीचा अर्ज आपल्या मोबाइलवर उपलब्ध होणार आहे.
शिंदे-फडणवीस यांचा पुढाकार
मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून विविध दुर्धर आजारांवरील उपचार, शस्त्रक्रियांसाठी शिंदे -फडणवीस सरकारने ८ हजार रुग्णांना ६० कोटी ४८ लाख इतक्या मदतनिधीचे वाटप केले. दर महिन्याला दीड ते दोन हजार अर्ज वैद्यकीय मदतीसाठी दाखल होतात, पैकी १ हजार अर्ज मंजूर होतात.
अर्ज दाखल केल्यानंतर ७ दिवसांत वैद्यकीय मदत संबंधित रुग्ण दाखल असणाऱ्या रुग्णालयाच्या खात्यात रक्कम जमा केली जाते. मात्र हा अर्ज घेऊन मुख्यमंत्री सहायता निधीच्या मंत्रालयातील कक्षापर्यंत पोहोचणे ग्रामीण भागातील जनतेला शक्य होत नाही. अशा जनतेसाठी ही मिसकॉलची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
मिसकॉल केल्यानंतर अर्जाची लिंक एसएमएसद्वारे मोबाइलवर येईल. त्या लिंकवर क्लिक करताच अर्ज डाऊनलोड होईल. या अर्जाची प्रिंट आऊट काढून तो भरावा. आवश्यक कागदपत्रांसह पोस्ट, प्रत्यक्ष किंवा स्कॅन करून पीडीएफ स्वरूपात cmrf.maharashtra.gov.in या ईमेल आयडीवर पाठवता येईल, असे सांगण्यात आले आहे.
कर्करोगावरील सर्वाधिक अर्ज
सहायता निधीसाठी सर्वाधिक येणारे अर्ज कर्करोगावरील उपचाराच्या मदतीसाठी असतात. हे प्रमाण एकूण अर्जांच्या २५ टक्के आहे. त्यापाठोपाठ हृदयविकार, अपघात, गुडघा प्रत्यारोपण, खुबा प्रत्यारोपण, डायलिसिस, किडनीविकार उपचारांच्या मदतीसाठी अर्ज येत असल्याचे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी दिली.
भाजलेल्या रुग्णांनाही मदत
भाजलेल्या तसेच शॉक लागलेल्या रुग्णांचाही या निधीतील आजारांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. अशा रुग्णांना ५० हजार रुपयांची मदत मुख्यमंत्री सहायता निधीतून देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. यापूर्वी अशा रुग्णांचा या योजनेत समावेश नव्हता.
लवकरच अप
वैद्यकीय कक्षाकडे येणारे बहुतांश अर्ज अर्धवट असतात. अर्जासाठी अप बनवले असून तिथे सर्व माहितीचे अर्ज स्वीकारले जातील. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना यापुढे कक्षाशी संपर्क करण्याची गरज राहणार नाही.