कामे स्थानिक पातळीवर व्हावीत, त्यांना विविध योजनांचे लाभ मिळावेत यासाठी शासन जनतेच्या दारी जाणार आहे. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून राज्यात ‘शासन आपल्या दारी’ हे अभियान सुरू करण्यात आले आहे. या अभियानाचा राज्यस्तरीय शुभारंभ 13 मे रोजी सातारा जिल्ह्यातील दौलतनगर (ता.पाटण) येथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाला आहे.
मात्र, या योजनेची पोलखोल भाजप आमदारानेच केल्याने खळबळ उडाली आहे. जालना जिल्ह्यातील अंबडमध्ये शासन आपल्या दारी योजना कार्यक्रमात पैसे घेतल्याचा आरोप भाजप आमदाराने केला आहे.
काय आहे प्रकरण?
भाजप आमदार नारायण कुचे यांच्याकडून पोलखोल करण्यात आली आहे. जालना जिल्ह्यातल्या अंबडमध्ये आज शासन आपल्या दारी योजनेचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी कामगार कल्याण विभागाकडून कीट घेण्यासाठी महिलांनी मोठी गर्दी केली होती. या कार्यक्रमाला भाजप आमदार नारायण कुचे यांचीही प्रमुख उपस्थिती होती. मात्र, एका कीटसाठी महिलांकडून फॉर्मसाठी सातशे रुपये तर कीटचे दीड हजार रुपये घेतले असल्याचे महिलांनी कुचे यांच्यासमोर सांगितले.आमदार कुचे यांनी या संपूर्ण घोटाळ्याची शासन आपल्या दारी या कार्यक्रमातचं पोलखोल केल्याने कामगार कल्याण विभागाच्या कर्मचाऱ्यात एकच खळबळ उडाली असून चौकशी करण्याची मागणी केली आहे.
काय आहे योजना?
राज्यात ‘शासन आपल्या दारी’ अभियानांतर्गत नागरिकांना विविध शासकीय योजनांचे लाभ आणि विविध महत्त्वाची कागदपत्रे एकाच ठिकाणी मिळणार आहेत. राज्यभर या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी मुख्यमंत्री सचिवालयात जनकल्याण कक्ष सुरू करण्यात आला आहे. या कक्षामार्फत राज्यातील अभियानाचे समन्वयन करण्यात येणार आहे. जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी या अभियानाचे प्रमुख आहेत. त्यांच्या माध्यमातून जिल्हा आणि तालुकास्तरावर देखील जनकल्याण कक्ष स्थापन करण्यात येणार आहेत.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त प्रत्येक जिल्ह्यातून किमान 75 हजार लाभार्थ्यांना विविध योजनांचा थेट लाभ दिला जाणार आहे. यासाठी जिल्हा,तालुकास्तरावर 2 दिवसीय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. राज्यातील सर्वसामान्य जनता, शेतकरी, महिला, विद्यार्थी यांचे प्रश्न त्वरित निकाली काढण्यासाठी ‘शासन आपल्या दारी’ हे अभियान राबविण्यात येत आहे.