आपल्या कसदार अभिनयाने ८०च्या दशकाचा काळ गाजवला, असे प्रतिभावंत, देखणं व्यक्तिमत्व, ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांचे निधन झाले. ते ७७ वर्षांचे होते. रवींद्र महाजनी हे गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील तळेगाव दाभाडे येथे राहत होते. त्यांचा मृतदेह बंद घरात आढळून आला. एक काळ गाजवणाऱ्या अभिनेत्याची अशी एक्झिट होणे हे दुःखदायक आहे. त्यांच्या जाण्याने मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
मराठीतील विनोद खन्ना अशी ओळख असणारे प्रतिभावंत अभिनेते रवींद्र महाजनी यांचे वयाच्या ७७ व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांचा मृत्यू निधन दोन ते तीन दिवसांपूर्वीच झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलीस तपासात व्यक्त केला जात आहे. माहितीनुसार, शुक्रवारी (दि.१४) पुण्यातील तळेगाव दाभाडे येथे रवींद्र महाजनी राहत असलेल्या घरातून दुर्गंधी आल्यानंतर शेजाऱ्यांनी पोलिसांना कळवलं. पोलिसांनी घराचे दार तोडून घरात प्रवेश केला. तपासात आढळून आले की, रवींद्र महाजनी यांचा मृत्यू झाला आहे. रवींद्र हे गेल्या ७ ते ८ महिन्यांपासून एकटेच राहत होते. त्यांचा मृतदेह त्यांचा मुलगा प्रसिद्ध अभिनेता गश्मिर महाजनी याच्याकडे शवविच्छेदानंतर ताब्यात देण्यात येणार आहे. रवींद्र महाजनी यांच्या जाण्यानं मराठी चित्रपट सृष्टीतून हळहळ व्यक्त होत आहे.
खेळ कुणाला दैवाचा कळला ?
रविंद्र महाजनी यांचा देवता चित्रपट गाजला. त्यात आशा काळे देखील प्रमुख भूमिकेत होत्या. या चित्रपटातील ‘खेळ कुणाला दैवाचा कळला?’ हे गाणं खुप गाजलं. ‘देवता’ चित्रपटातील हे गाणे अनुराधा पौडवाल, उषा मंगेशकर, सुरेश वाडकर यांनी गायलं होतं. हे गाण रवींद्र महाजनी आणि आशा काळे यांच्यावर चित्रित झाले आहे. या गाण्याने चाहत्यांच्या मनावर गारुड केलं. आजही ते गाण लोकांच्या मनात रुंजी घालते.