अभिनेता सलमान खानचा सिकंदर हा चित्रपट रमजान ईदच्या दिवशी प्रदर्शित होत आहे. सलमान खान सध्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. दरम्यान त्याने एक फोटो शूट केलं आहे. त्यामध्ये त्याच्या हातावर भगवं घड्याळ आहे आणि या घड्याळाच्या डायलवर राम मंदिर आहे. यावरुन आता मौलानांचा संताप झाला आहे.
सलमान खानचे घड्याळासह फोटो सोशल मीडियावर
सिकंदर सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र असलेल्या सलमान खानने रामजन्मभूमीचं चित्र असलेल्या घड्याळसह त्याचे फोटो पोस्ट केले आहेत. सलमान खानने घातलेलं हे घड्याळ जेकब अँड कंपनी एपिक एक्स रामजन्मभूमी टायटॅनियम एडिशन 2 आहे. हे लिमिटेड एडिशन वॉच असून त्याची किंमत ३४ लाख रुपये आहे.
इथोसच्या वेबसाईटने घड्याळाबाबत काय म्हटलं आहे?
प्रभावी डिझाइन नव्हे तर राम जन्मभूमी स्थळाच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक साराचे प्रतिबिंबित करणाऱ्या अद्वितीय कोरीवकामामुळे देखील हे घड्याळ वेगळं आहे. या मर्यादित आवृत्तीच्या घड्याळाच्या केसवर अत्यंत गुंतागुंतीचे कोरीवकाम आहे, जे राम जन्मभूमीशी जोडलेले घटक आणि भारतीय इतिहासातील त्याचे महत्त्व दर्शवते असं इथोसच्या वेबसाईटने म्हटलं आहे. दरम्यान हे घड्याळ घालून फोटो पोस्ट केल्याने मौलाना शहाबुद्दीन रझवी बरेलवी संतापले आहेत.
मौलवी शहाबुद्दीन यांचं म्हणणं काय?
सलमान खान देशातील प्रसिद्ध अभिनेते आहेत. सिनेमासृष्टीत त्यांच्या नावाची चर्चा कायमच होत असते. मला हे समजलं आहे आणि विचारणा झाली आहे ती त्यांच्या हाती असलेल्या रामजन्मभूमीच्या घड्याळाबाबत. सलमान खान प्रसिद्ध मुस्लिम अभिनेता आहे. त्याचे अनेक चाहते देशभरात आहेत. सलमानचे लाखो फॉलोअर्स आहेत. सलमानने राम मंदिराच्या प्रचारासाठी राम जन्मभूमीचं चित्र असलेलं घड्याळ त्याने हाती घातलं आहे. यावर शरियत नुसार मी हे सांगू इच्छितो की कुठलाही मुस्लिम माणूस मग तो सलमान खान का असेना तो राम मंदिरांचा प्रचार करत असेल किंवा गैर इस्लामी संस्थांचा किंवा धार्मिक गोष्टींचा प्रचार करत असतील तर ती कृती हराम आहे. अशा माणसाने माफी मागितली पाहिजे. तसं यापुढे गैर मुस्लिम धार्मिक गोष्टींचा प्रचार करणार नाही याचं आश्वासन दिलं पाहिजे. सलमान खानला माझा सल्ला आहे की शरियतचा त्याने सन्मान करावा. तसंच शरियतने जे सांगितलं आहे ते मान्य करावं. सलमान खानची दिनचर्या जी आहे ती शरियत प्रमाणे असली पाहिजे. त्यांनी नियमांचं पालन केलं तर कयामतच्या दिनी त्यांना उत्तर द्यावं लागणार नाही. राम एडिशनचं घड्याळ सलमान खानने हातात घालणं हे योग्य नाही. असं करणं शरियतनुसार हराम आहे. असं मौलाना शहाबुद्दीन रझवी बरेलवी यांनी म्हटलं आहे. शहाबुद्दीन हे ऑल इंडिया मुस्लिम जमातचे अध्यक्ष आहेत.
सलमान खान हा बॉलिवूडचा सुप्रसिद्ध अभिनेता आहे. सिकंदर हा सिनेमा घेऊन तो प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. यामध्ये त्याच्यासह रश्मिका मंदानाचीही भूमिका आहे. राम मंदिराचं चित्र असलेलं घड्याळ घातल्याने मात्र त्याच्यावर टीका झाली आहे. मौलाना शहाबुद्दीन यांन त्याला माफी मागण्याचा सल्ला दिला आहे.