हिंदी चित्रपटांमध्ये नकारात्मक भूमिका साकारणारी अभिनेत्री कुनिका सदानंद सध्या बिग बॉस १९ मध्ये दिसत आहे. या शोबरोबरच ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. कुनिकाने ‘हम साथ-साथ हैं’, तलाश, खिलाडी, मोहरा, बेटा यासारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. कुनिका सदानंदने अलीकडेच एका मुलाखतीत कुमार सानूबरोबरच्या अफेअरबद्दल धक्कादायक खुलासे केले होते.
१९९० च्या दशकातील प्रसिद्ध गायक कुमार सानू हे केवळ त्यांच्या गाण्यांमुळेच नव्हे तर त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत राहिले. त्यांचे नाव अनेक महिलांशी जोडले गेले होते, ज्यात अभिनेत्री कुनिका सदानंदचाही समावेश आहे. सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या एका मुलाखतीत कुनिकाने कुमार सानूबरोबरच्या तिच्या सहा वर्षांच्या नात्याबद्दल उघडपणे भाष्य केलं होतं.
कुमार सानू व कुनिका एकमेकांशी पती-पत्नीसारखे वागायचे. त्यांची पहिली भेट उटी येथे झाली, तिथे कुनिका एका प्रोजेक्टचे शूटिंग करत होती आणि कुमार सानू त्यांच्या बहिणी आणि मुलांबरोबर फिरायला आले होते.
कुनिका-कुमार सानूच्या पहिल्या भेटीचा किस्सा
“एकदा रात्रीच्या जेवणानंतर सानू खूप दारू प्यायले आणि जोरात रडू लागले. ते हॉटेलच्या खिडकीतून उडी मारण्याचा प्रयत्न करत होते. त्यावेळी त्यांच्या बहिणी, पुतणे आणि मी त्यांना सांभाळलं. ते खूप दुःखी होता कारण त्यांना लग्न मोडायचं होतं, पण मुलांपासून दूर जायचं नव्हतं. त्या दिवशी मी त्यांना समजावून सांगितलं होतं की त्यांनी त्यांचे काम करावे आणि मुलांची काळजी घ्यावी. यानंतर ते माझ्या शेजारी राहू लागले. आम्ही एकत्र जेवायचो, मी त्यांना वजन कमी करण्यास मदत केली होती,” असं कुनिकाने सांगितलं.
कुमार सानूच्या पत्नीने कुनिकावर केलेला हल्ला
कुमार सानूच्या कुटुंबाचा आदर म्हणून कुनिकाने हे नातं लपवून ठेवलं होतं. दोघे फक्त स्टेज शोमध्ये एकत्र दिसायचे. कुनिका कुमार सानूने कोणते कपडे घालायचे, ते ठरवायची. पण नंतर कुमार सानूच्या पहिल्या पत्नीला दोघांच्या नात्याबद्दल समजलं. रीता भट्टाचार्यने कुनिकावर हल्ला केला होता. कुनिका म्हणाली, “रीताने माझ्या गाडीवर हॉकी स्टिकने हल्ला केला आणि माझ्या घराबाहेर गोंधळ घातला. तिला कुमार सानूकडून तिच्या मुलांसाठी पैसे हवे होते, जे चुकीचं नव्हतं.” या सगळ्या प्रसंगांनंतर कुमार सानू व कुनिकाचं नातं तुटलं. “मी त्यांना माझा पती मानत असे आणि त्यांना साथ देत होते,” असं कुनिका म्हणाली होती.