विदेशी बँकेत नोकरी लावून देतो असे म्हणून 50 लाख 85 हजार आणि विदेशातून कर्ज मिळवून देण्याच्या नावावर 72 लाखांनी फसवणूक केल्याची घटना नागपुरात घडली. या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने आरोपी आशिक अली नाथानी मोहीबअली नाथानी (वय 73) व हसन अहमद शेख (वय 62, दोन्ही रा. पनवेल) यांना अटक करण्यात आली. उद्या मंगळवारी 8 ऑगस्टपर्यत त्यांचा पीसीआर घेण्यात आला आहे.
पोलिसांनुसार फिर्यादीच्या मुलाला युरोप मधील सायप्रस कन्ट्री येथील पाईंट बँकेत मासिक 60 हजार युएस डॉलर (48 लाख रूपये) पगाराची नोकरी लावून देतो असे आमीष दिले. त्यासाठी भामट्याने फिर्यादीसह त्याची पत्नी व मुलाचे पासपोर्ट मागीतले. काही फॉरमॅलीटी पूर्ण करण्याकरीता काही पैसे लागतील असे सांगितले. त्यावरुन वेळोवेळी फिर्यादीने आरोपी आशिकअली याच्या सानपाडा, नवी मुंबई येथील आय.सी.आय.सी.आय बँक खात्यात एकूण 50 लाख 85 हजार रूपये वळते केले. या नंतर फिर्यादीने मुलाच्या नोकरीबाबत वारंवार विचारणा केली असता आरोपीने उडवाउडवीची उत्तरे दिली. तसेच फिर्यादीचे पैसे सुध्दा परत दिले नाही. त्यामुळे फिर्यादीने बर्डी पोलिस ठाण्यात तक्रार दिली.
दुसऱ्या एका फसवणूक प्रकरणात आरोपी आशिकअली नाथानी मोहीबअली नाथानी (वय 73) व हसन अहमद शेख (वय 62, दोन्ही रा. पनवेल) यांच्या विरोधात पाचपावली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. यात आरोपींनी विदेशातून कर्ज मिळवून देतो म्हणून 72 लाखांनी फसवणूक केली. आरोपींनी फिर्यादीला आपण आर. एस. इन्व्हेंस्टमेंट बँक आणि ट्रस्टचे अध्यक्ष असल्याची थाप मारली. आपण 300 एकर संत्रा बगीचा खरेदी करायला आलो असून कमी व्याज दरात सॉफ्ट लोन देण्याचे आमिष दाखवले. आमचे विदेशात पैसे आहे. ते आम्ही थेट कोणत्याही व्यवसायामध्ये गुंतवू शकत नाही. मात्र फिर्यादीला सॉफ्ट लोनच्या मार्फत फन्डींग करु शकतात असे सांगितले.
फिर्यादीने होकार देताच सॉफ्ट लोन देण्याची हमी दिली. फिर्यादीने आरोपीं सोबत सॉफ्ट लोन संदर्भात सॉफ्ट लोन करारनामा तयार केला. लोनची रक्कम आरबीआयच्या माध्यमातून विदेशातून भारतात मागविण्याकरिता टॅक्सेशन लागत असल्याचे सांगितले. फिर्यादीने आरोपींना एकूण 72 लाख रूपये दिले. त्यानंतर आरोपींनी 5-5 मिलीअन युएस डॉलरचे (भारतीय चलनात 80 कोटी) असे 10 मिलीअन डॉलरचे डी. डी. दिले. त्यावर आर. एस. इन्व्हेंस्टमेंट बँक अॅण्ड ट्रस्ट, एलईआय नाव नमुद होते. परंतु हे डी. डी. युएसमध्ये वटु शकले नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादीने तक्रार केली.