निधी वाटपावरून खासदार हेमंत पाटील यांनी पणन व हिंगोलीचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांना थेट शिवीगाळ केली. हा प्रकार झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या ऑनलाईन बैठकीत घडला. खा. पाटील यांनी टक्केवारीचे शेण खाल्ले जात असल्याचा आरोप करीत सत्तार यांना शिवीगाळ केली. त्यामुळे ऑनलाईन बैठकीत पाटील यांचा माईक म्युट करण्यात आला.
यासाठी खा. हेमंत पाटील, आ.तान्हाजी मुटकुळे, आ.संतोष बांगर, आ.राजू नवघरे यांचीही उपस्थिती होती. तर जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने, प्रभारी जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर जाधव आदीही उपस्थित होते.
बैठकीच्या सुरुवातीलाच पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली. हिंगोलीसारख्या मागासलेल्या जिल्ह्यात येऊन अशा पद्धतीने शेण खाणे योग्य नाही. यावर पालकमंत्री आणि पाटील यांच्यामध्ये खडाजंगी झाली. पाटील यांनीही अशीच पद्धत चालू राहणार असेल, तर तुम्ही किंवा तुमची माणसे जिल्ह्यात आली, तर त्यांना शिवसैनिक पायाखाली तुडवतील, असा इशारा दिला. यामुळे बैठकीत काही वेळ वातावरण तणावपूर्ण झाले होते. सर्व अधिकाऱ्यांसह आमदारांनी शांत राहणे पसंत केले.
मागील काही दिवसांपासून निधी वाटपावरून जोरदार रस्सीखेच पाहायला मिळत आहे. आमदार आणि खासदारांमधून नाराजीचा सूर निघत आहे. पालकमंत्री सत्तार अतिवृष्टीच्या पाहणी दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी खासदारांना आरक्षणाच्या प्रश्नावरून उल्लू असल्याचे म्हटले होते. त्यानंतर नेते आनंद जाधव यांनी सत्तार यांना समज दिली जाईल, असे सांगितले होते. आ.बांगर यांचेही त्यांच्याशी मतभेद झाले होते. आ.तान्हाजी मुटकुळे यांचाही सत्तार यांच्यावर रोष आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची १० जानेवारीरोजी हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर येथे सभा होणार आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर शिंदे कोणती भूमिका घेतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.