उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यंदाही नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. २००९ मध्ये दक्षिण-पश्चिम विधानसभा क्षेत्राची निर्मिती झाल्यापासून देवेंद्र फडणवीस या मतदारसंघातून विजयी होत आहे. उपमुख्यमंत्री यांचा बालेकिल्ला असलेल्या दक्षिण-पश्चिम विधानसभा क्षेत्रातील हालचालींकडे संपूर्ण राज्यातील जनतेचे लक्ष लागले आहे. यंदा दक्षिण-पश्चिम विधानसभा क्षेत्रातून निवडणुकीसाठी ४० अर्ज दाखल करण्यात आले. यापैकी निवडणूक आयोगाने १९ अर्ज स्वीकारले तर १८ अर्ज बाद केले. उर्वरित तीन अर्जांवर अद्याप निर्णय झालेला नाही. बुधवारी सायंकाळपर्यंत निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, नागपूर शहरातील सहा विधानसभा क्षेत्रातील मतदारसंघापैंकी सर्वाधिक अर्ज दक्षिण-पश्चिम विधानसभा क्षेत्रातच बाद झालेले आहेत.
यांचे अर्ज मंजूर
नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघातून भाजपच्यावतीने स्वत: देवेंद्र फडणवीस मैदानात आहेत तर त्यांचे मुख्य प्रतिद्वंदी म्हणून कॉँग्रेसने प्रफुल गुडधे पाटील यांना निवडणूकीच्या रिंगणात उभे केले आहे. दोन्ही प्रमुख उमेदवाराचे अर्ज निवडणूक आयोगाने मंजूर केले आहेत. याशिवाय भीमसनेचे पंकज शंभरकर, बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पक्षाचे मारोती वानखेडे, बहुजन समाज पक्षाचे सुरेंद्र डोंगरे, वंचित बहुजन आघाडीचे विनय भांगे, पीपल्स पार्टी ऑफ इंडियाचे ओपुल तामगाडगे, अखिल भारतीय परिवार पक्षाच्या उषा ढोक, विकास इंडिया पक्षाचे विनायक अवचट यांचे अर्ज मंजूर करण्यात आले. अपक्ष उमेदवारांमध्ये नितीन गायकवाड, सचिन वाघाडे, महमूद खान, विनोद मेश्राम यांचा समावेश आहे. नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा क्षेत्रात काही उमेदवारांनी एकपेक्षा अधिक अर्ज दाखल केले होते. यात कॉंग्रेसचे प्रफुल गुडधे पाटील यांनी सर्वाधिक चार तर भाजपचे देवेंद्र फडणवीस यांनी दोन अर्ज दाखल होते. दोघांचेही सर्व अर्ज मंजूर करण्यात आले. ४ नोव्हेंबर ही अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे. या मुदतीपर्यंत इतर अर्ज मागे घेतले जातील.
बाद झालेले उमेदवार
दक्षिण-पश्चिम विधानसभा क्षेत्रात एकूण ४० अर्जांपैकी १८ अर्ज बाद झाले. यात देश जनहित पक्षाचे घनश्याम पुरोहित, ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉकचे ॲड.संतोष लांजेवार, लोक स्वराज्य पक्षाचे अमोल हाडके, रिपब्लिकन पक्षाचे रामचंद्र वानखेडे, बळीराजा पक्षाचे दत्तु मोहिते, राष्ट्रीय गोंडवाना पक्षाच्या संस्कृती पेंडोर, रिपब्लिकन सेनेचे राजेंद्र मेश्राम यांचे अर्ज बाद करण्यात आले. याशिवाय अपक्ष उमेदवार जॉनी रायबोर्डी, सुरेश घाटे, वर्षा नांदगावे, चक्रधर जांभुळे, अजय डांगे, यशवंत कावरे, पंकज काळबांडे, उषा चौधरी यांचे अर्ज बाद झाले.