राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या शहरात नव्या वर्षात पहिल्याच आठवड्यात कायदा व सुव्यवस्थेला गुंडांनी आव्हान दिले आहे. मद्य पाजण्यास नकार दिला म्हणून सहा जणांनी मिळून मित्रांवरच लोखंडी रॉडने केलेल्या प्राणघातक हल्यात एकाचा गंभीर रक्तस्त्राव होऊन मृत्यू झाला. या जीवघेण्या हल्ल्यात आणखी चौघे जखमी झाले असून त्यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.
कळमना पोलीस हद्दीतील पर्वती नगरातल्या माझरी रेल्वे बोगद्याजवळ शनिवारी रात्री साडे आकराच्या सुमारास ही थरारक घटना घडली. रितिक सावनलाल पटले (२२) रा. पार्वती नगर, कळमना गाव असे जीवघेण्या हल्ल्यात खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर यात सलिम शेख, शिवप्रसाद नागपुरे, संगीता, तनशू शिवप्रसाद हे चौघे जखमी झाले. यापैकी सलिमची प्रकृती चिंताजनक असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.
ईशा हातिम अन्सारी (५५), मुस्तफा उर्फ गोलू ईशा अन्सारी, लुकमान ईशा अन्सारी (२२) साहिल ईशा अन्सारी (२०) सलाउद्दीन ईशा अन्सारी (१९), शाहिद उर्फ बबूआ इशा अन्सारी अशी मित्रांवरच लोखंडी रॉडने हल्ला करत खून केलेल्या सहा जणांची नावे आहेत.
घटनेच्या दिवशी शनिवारी रात्री रितिक पटले हा मित्र सलिम, तनशू आणि अन्य काही जणांसोबत पार्वती नगरातलल्या अनिकेत किराणा दुकानाजवळील घरासमोर बोलत उभे होते. त्यावेळी मुस्तफा तिथे आला. त्याने रितीकला मद्य पाजण्यासाठी आग्रह केला. रितीकने नकार दिल्यानंतर मुस्तफा तेथून निघून गेला. थोड्या वेळेनंतर मुस्तफा पुन्हा तिथे आला आणि रितिक व तनशूला सोबत घेऊन मद्य पाजण्यासाठी कांजी हाऊस चौकात आला.
दरम्यान मित्रामित्रांमध्ये चेष्टा मस्करी सुरू झाली. त्याचा राग आल्याने मुस्तफा रितिक आणि सलिमला माझरी रेल्वे बोगद्याच्या खाली सोडून निघून गेला. अखेर रितिक आणि सलिम घरी पायी जात असताना तुकलामने दोघांना दूरध्वनीवरून जीवे मारण्याची धमकी दिली. त्याच रस्त्यावरून जात असताना हे तिघेही एकमेकांसमोर आले. हा वाद विकोपाला गेल्याने सहा जणांनी चाकू आणि लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला सुरू केला. यात रितिक रक्ताच्या थारोळ्यात पडला.
दरम्यान तनशू तिथे आला. तो भांडण सोडवत असताना मुस्तफा आणि त्याच्या तीन साथीदारांनी त्यालाही मारहाण केली. लोकांची गर्दी वाढत असल्याने पाहून सर्व जण पळून गेले. जखमींना उपचाराकरिता मेयोत नेले असता डॉक्टरांनी रितिकला तपासून मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच कळमना पोलिसांनी न्याय वैद्यक पथकाला पाचारण करत खुनात रक्ताने माखलेला चाकू आणि लोखंडी रॉड जप्त करत सहा जणांना अटक केली.
विश्वभारत News Website