३० एप्रिल राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जन्मदिवसवर कार्यक्रम
टेकचंद्र शास्त्री:
9822550220
नागपुर। आज साठ वर्षांआधीचे आमचे बालपण आठवते. फाटके कपडे, तुटक्या चपलाही पायात नव्हत्या. फाटक्या कपड्याला लावायला चिंधी सापडत नव्हती. मायच्या हाताची सुई-दोऱ्याची तुरपाई सिलाई मशीनला लाजवायची. बापाचे ठिगळं झालेलं धोतर, मायच्या लुगड्याच्या चिंध्या यातून माय वाकळ शिवायची — तीच वाकळ, गोधडी आमचं पांघरूण होते. वाकळ थंडीत गरम वाटायची तर उन्हाळ्यात शरीराला नरम वाटून मायची माया त्यात जाणवायची.
घराघरातली माय कुरड्या, पापड, धापोडे, शेवया, सरगुंडे बनवायची — ही उन्हाळी यात्रा प्रत्येक परिवारात सुरू राहायची. आमचे चिमुकले हात थोडीफार मदत करायचे. पावसाळा येणार, माय सुंदर मातीची चूल बनवायची, आम्ही मातीत हात भिजवीत आनंद घेत होतो.
गावखेड्यात तर ह्या सर्व कार्यात मदतीला शेजारी-पाजारी असलेल्या धर्माच्या आज्या, मावश्या, आत्या, माम्या असायच्या. त्यांची जात, धर्म कधीच आडवी येत नव्हती.
गावगाड्यातील देवळाच्या पारावर आरती, भजन सोबतच गावातल्या अनेक समस्यांवर वडीलधारी मंडळींची चर्चा व्हायची, त्यातून अनेक गावसमस्या सुटायच्या. अन्नधान्याचा दुष्काळ गावांनी खूप काळ पाहिला, पण गावातील प्रेमाच्या ओलाव्याने उपासमार टळली. एका भाकरीतील चौथकोर शेजाऱ्याला द्यायची — हा शेजारधर्म पाळला जायचा.
गावात पाहुणचाराला आलेले पाहुणे गावचे पाहुणे असायचे. त्यांचा पाहुणचार ज्यांच्या घरी आले त्यांच्यापेक्षा शेजारी-पाजारीच जास्त करायचे.
गावगाड्यातील लग्न हा गावचा उत्सव :
गावगाड्यात बोटावर मोजण्याइतके श्रीमंत असायचे. मोठा मानवी समूह यांचा जीवनसंघर्ष कर्जबाजारीच असायचा. गावातील एखाद्या कुटुंबातील विशेषतः मुलीचं लग्न सर्व गावगाड्याच्या सहकार्यातून घडायचे. रात्रीचे लग्न असायचे — उन्हामुळे आकाशाच्या मांडवाखाली गॅसबत्तीच्या प्रकाशात. कारण शेतकऱ्यांचा हंगाम नसायचा. लग्न घरासमोर झाडाच्या हिरव्यापानांचा मांडव उन्हाचा तडाखा थंड करायचा. या घरातील लगीनघाई मुहूर्ताच्या पाच-सहा महिने आधीच सुरू व्हायची. गावातल्या बाया-बापड्या धान्य निवडायला दुपारी लगीनघरी जमायच्या. काही म्हाताऱ्या सुंदर गाणे म्हणत काम करणाऱ्यांना स्फूर्ती द्यायच्या. लगीनघरी कमी असेल ते भांडे-कुंडे, गोण्या, वाकळी, गाद्या, धान्य अनेक घरातून मदत यायची. तेथे पिढ्यानपिढ्यांचा भांडणतंटा मिटलेला — हे गावगाड्याचं काम म्हणून सहकार्याची भावना.
आम्ही शहरात राहणारे आईच्या माहेरी मामाच्या गावात गावभाचे. रानमेवा खाण्याची रेलचेल. गावात आलेल्या पाहुण्यांच्या पंगती लग्नात प्रथम बसायच्या — तो त्यांचा मान. गावातले लहान पोरं भुकेलेली राहायची, कारण चुलीला आवतन. माय-बाप लग्नघरच्या कामात व्यस्त.
हा वेगळाच जीवनाचा आनंद आज गावगाड्यातही संपत चालला आहे. गावच भकास होत आहे. कुडाच्या घरांची जागा सिमेंट-काँक्रीटने घेतली. प्रशस्त वाडे, अंगण, पळसबाग सारंच संपलं — संयुक्त घराच्या वाटण्यांनी घरपणच हरपलेलं आहे. शहरीकरणातला मतलबपणा गावखेड्यात पोहोचला आहे. बैलजोडीची आणि गोधनाची श्रीमंती आज यंत्राच्या गाड्या-घोड्यांनी घेतली. कोंबड्यापालन आणि बकऱ्या धन वाढलं. आज खेड्यातच दही, दूध मिळेनासं झालं.
_पोशिंदा म्हणविशी जगाचा, तुझे पाठीशी पोट ।_
_ऐतखाऊंच्या दारी वाहते, दह्या-दुधाचे लोट ।_
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेच्या एका ओवीत लिहिले :
_गाव हा विश्वाचा नकाशा । गावावरून देशाची परीक्षा ।_
_गावचि भंगता अवदशा । येईल देशा ॥४९॥ ग्रा. अ. १_
भंगलेली गावे सावरली जावी याची चिंता आज सत्ताधाऱ्यांना, शिक्षितांना वाटत नाही, असे जाणवते.
ग्रामजयंतीचा मंत्र घ्या हो नवा :
ही गावखेड्यांना येणारी अवदशा राष्ट्रसंत तुकडोजींना १९५५ ला ग्रामगीतेच्या निर्मितीच्या वेळेसच लक्षात आलेली होती. राष्ट्रसंतांच्या सोबत गुरुदेव सेवा मंडळात काम करणाऱ्या काही प्रेमीजनांनी राष्ट्रसंतांकडे एक प्रस्ताव ठेवला — त्यांचा जन्मदिवस साजरा करण्याचा. साधेभोळे प्रेमीजन, त्यांच्या भावना जरी सात्विक होत्या, तरी स्तोम माजवण्याच्या प्रवृत्तीला राष्ट्रसंतांचा विरोध असायचा. कारण गुरु-शिष्य अशा परंपरा त्यांना मान्य नव्हत्या. पण शेवटी प्रेमीजनांच्या आग्रहाला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, “गड्यांहो, माझा जन्मदिवस साजरा करण्यापेक्षा तुम्ही तुमच्या गावाचा जन्मदिवस समजून ‘ग्रामजयंती’ म्हणून साजरा करा.” आपला जन्मतारखेचा २९ एप्रिल की ३० एप्रिल हा घोळ मिटवत ३० एप्रिल १९०९ हा जन्मदिवस राष्ट्रसंतांनी घोषित केला. त्यांनी ग्रामजयंती यावर भजन, लेख लिहिले. ते एका भजनात लिहितात :
_ग्रामजयंतीचा मंत्र घ्या हो नवा ।_
_देशात समता नांदवा ॥_
भारत हा विविध धर्म, भाषा, संस्कृती यांनी नटलेला — त्यात एकात्मता असावी. कारण स्वातंत्र्यानंतर राष्ट्रभक्तीची जागा राजकारण्यांच्या विकृत राजकारणाने जाती, पोटजात, धर्म, भाषा यांमध्ये मानवी मनच वाटली. स्वाभिमानी राष्ट्राचे स्वातंत्र्यवीरांचे स्वप्न ७५ वर्षांत आम्ही पूर्ण करू शकलो नाही. आजही स्वावलंबी भारताचे स्वप्न अपूर्णच आहे. राष्ट्रसंत व्यथा मांडतात :
_एकाच्या महालात फुलताति बागा ।_
_दुसऱ्यास धड नाही राहण्यास जागा ॥_
_अन्नासाठी फिरतो नागवा ॥_
_देशात समता नांदवा । ग्रामजयंतीचा मंत्र घ्या हो नवा ॥_
मित्रांनो, ही श्रीमंती-गरिबीची मानवी तफावत आज देशात सपाटून वाढत आहे. मोफत घरकुल, मोफत धान्य लाखो कुटुंबांना मिळूनही तरी उघड्यावर दिवस काढणारे आहेत. मुठभरांची श्रीमंती कवेत मावत नाही. श्रीमंतांच्या घरांची संख्या वाढली, कुटुंब लहान झाले. अनेकांची मुले विदेशातच स्थिरावली. हा भेदाभेद कसा मिटणार?
_क्रांतीची ही लाट गावात आली ।_
_सत्यास न्यायास प्रेमास व्याली ॥_
_राखा हिच्या वैभवा ॥_
_देशात समता नांदवा । ग्रामजयंतीचा मंत्र घ्या हो नवा ॥_
आज गावांमध्ये शेतीकामाला मजूर नाही. शिकलेली मुले गावाकडे यायला तयार नाहीत. श्रमाची लाज सर्वांनाच वाटत आहे. सर्व उत्पादनाची भाववाढ होते. शासकीय अथवा खासगी नोकर वर्ग पगारवाढीसाठी संघटित प्रयत्न करतात. शेतीमालावर प्रक्रिया करणारे उद्योग आपल्या वस्तूचे भाव ठरवतात. पण शेतकऱ्यांच्या उत्पादनाला गेल्या पंचवीस-तीस वर्षांत खर्चाएवढेही दाम मिळते का? याची कोणालाच या देशात चिंता नाही. जे शेतकरी आंदोलने होतात त्यांना चिरडण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून होतो. मला वाटतं, एकदा निसर्गानेच मोठा अन्नधान्याचा दुष्काळ पाडावा — जो आम्ही साठ ते ऐंशीच्या दशकात भारतात प्रत्येकाने अनुभवला. तेव्हाच अन्नधान्य निर्माण करणाऱ्या शेतकऱ्याचे महत्त्व पटेल.
_तो दास तुकड्या विनवुनि सांगे ।_
_बैसू चला सर्व एकाचि रांगे ॥_
_निजधर्मतत्त्वा जागवा ॥_
_देशात समता नांदवा । ग्रामजयंतीचा मंत्र घ्या हो नवा ॥_
मित्रांनो, शेवटी आम्ही हाडामासाची माणसं आहोत. तरी आम्ही आमच्यातली माणुसकी गहाण का ठेवतो? राष्ट्रसंत यांच्यासारखा मानवतावादी आपल्याला विनवून सांगतो — एका समतेच्या रांगेत बसून मानवतेच्या धर्माला जागवा. मानवसमूहातल्या देवांना राष्ट्रसंत वर मागतात :
_नांदोत सुखे गरिब-अमीर एकमतानी ।_
_मग हिंदू असो, ख्रिश्चन वा हो इस्लामी ।_
_’स्वातंत्र्य सुखा’ या सकलांमाजि वसू दे ।_
_दे वरची असा दे, या भारतात बंधू-भाव नित्य वसू दे ॥_
_सकळांस कळो, ‘मानवता राष्ट्रभावना’ ।_
_हो सर्वस्थळी मिळूनि, ‘समुदाय प्रार्थना’ ।_
_उद्योगी तरुण वीर, शीलवान दिसू दे ।_
_दे वरचि असा दे ॥_
मित्रांनो, संत-महापुरुषांच्या स्वप्नातील भारत त्यांनी स्वातंत्र्यासाठी सांडवलेले रक्त, गाळलेला घाम याचा विचार तुम्ही आपल्या येणाऱ्या पिढ्यांना सुखी, स्वाभिमानी करण्यासाठी करणार आहात का? उठा, देशात समता नांदावी म्हणून महापुरुषांच्या विचारांची प्रेरणा घेऊया!
— ज्ञानेश्वर दुर्गादास रक्षक
अभ्यासक, राष्ट्रसंत तुकडोजी विचारधारा
९८२३९६६२८२
विश्वभारत News Website