गच्च भरल्या मेघात
बघ दाटला पाऊस…
सरीतून ऐकेन मी,
त्याच्या मनातले गूज
सरी उतरल्या खाली
पायी बांधुनिया चाळ…
शिवारात रांगणार,
आता पावसाचे बाळ
मोरपीस अलगद
तशा झरतात धारा…
वार्यासवे पावसाचा,
आला फुलून पिसारा
काय बोलला पाऊस ?
सांगा मातीच्या कानात
स्वप्न हिरवे फुलले,
तिच्या प्रत्येक कणात
जणू वाटावा विठ्ठल
तसा पाऊस सावळा
ढग वारकरी सारे,
त्यांचा आभाळात मेळा
उज्वला सुधीर मोरे
वाशिम
9552711968