🔺 जिल्ह्यातील बाधितांची एकूण संख्या 3446
चंद्रपुर(दि.4सप्टेंबर):-जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढतच आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय परिसरात लिक्विड व ऑक्सीजन प्लॅन्ट उभे करण्याची कारवाई तात्काळ करावी तसेच 100 खाटांचे अद्ययावत कोविड सेंटर उभारण्याचे नियोजन करण्याचे निर्देश कोविड रुग्णालयाची पाहणी करताना दिलेत.
कोरोना विषयक आढावा घेतांना जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी बोलताना कोरोना चाचणी करताना नागरिकांना जास्त वेळ थांबावे लागणार नाही अशी सुविधा करावी याकडे लक्ष द्यावे असेही त्यांनी सूचना केल्यात. खाजगी डॉक्टरांच्या मदतीने कोरोना बाधितांना सेवा देण्याच्या सूचना आरोग्य यंत्रणेमार्फत द्याव्यात असे त्यांनी सुचविले. त्याचप्रमाणे, रुग्णालयातील सर्व विभागानुसार नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक करावी.
रुग्णालयात लागणारे आवश्यक साहित्य, औषधे याविषयी साठा उपलब्ध असावा तसेच रुग्णांच्या नातेवाइकांना माहिती मिळावी यासाठी मार्गदर्शन केंद्र सुरू करावे. त्याचप्रमाणे, कोविडसाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध व्हावे यासाठी जाहिरात काढावी अशा सूचना जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी आरोग्य यंत्रणेला केल्यात.
यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, अधिष्ठाता डॉ.एस.एन.मोरे, वैद्यकीय अधीक्षक डॉ.भास्कर सोनारकर, वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी तथा अँटीजेन चाचणीचे नोडल अधिकारी डॉ.अनंत हजारे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे आनंद भास्करवार, राजेश चौहान उपस्थित होते.
चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या आता 3446 आहे. आतापर्यंत जिल्ह्यामध्ये उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या 1 हजार 799 आहे. तर आतापर्यंत कोरोनातून 1 हजार 608 बाधित बरे झाल्याने सुटी मिळालेले आहे.
आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांमध्ये चार बाधितांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. यामध्ये, रामनगर चंद्रपूर येथील 83 वर्षीय पुरूष बाधिताचा मृत्यू झाला आहे. या बाधिताला 27 ऑगस्टला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते. कोरोनासह न्युमोनियाचा आजार असल्याने 3 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे मृत्यू झाला आहे.
दुसरा मृत्यु हा 38 वर्षीय राजुरा चंद्रपूर येथील पुरुष बाधिताचा मृत्यू झाला आहे. 3 सप्टेंबरला बाधिताला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते. 3 सप्टेंबरलाच बाधिताचा उपचारादरम्यान शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे मृत्यू झाला आहे. या बाधिताला कोरोनासह न्युमोनिया होता.
बाबुपेठ चंद्रपूर येथील 60 वर्षीय महिला बाधितेचा मृत्यू झाला आहे. या बाधितेला 1 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते. कोरोनासह न्युमोनियाचा आजार असल्याने आज 4 सप्टेंबरला सकाळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे मृत्यू झाला आहे.
तर,चवथा मृत्यु 80 वर्षीय चंद्रपूर शहरातील पुरुष बाधिताचा मृत्यू झाला आहे. 3 सप्टेंबरला बाधिताला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते. आज 4 सप्टेंबरला सकाळी बाधिताचा उपचारादरम्यान शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे मृत्यू झाला आहे. या बाधिताला कोरोनासह न्युमोनिया होता. जिल्ह्यात आतापर्यंत 39 कोरोना बाधितांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. यापैकी, चंद्रपूर 35, तेलंगाणा एक, बुलडाणा एक आणि गडचिरोली 2 बाधितांचा समावेश आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील चंद्रपूर शहर व परिसरातील 132, चिमूर तालुक्यातील 1, जिवती तालुक्यातील 2, नागभीड तालुक्यातील 2, पोंभुर्णा तालुक्यातील 8, बल्लारपूर तालुक्यातील 25, ब्रह्मपुरी तालुक्यातील 12, भद्रावती तालुक्यातील 12, मूल तालुक्यातील 12, राजुरा तालुक्यातील 15, वरोरा तालुक्यातील 12, सावली तालुक्यातील 24, सिंदेवाही तालुक्यातील 4, गोंडपिपरी तालुक्यातील 12, कोरपना तालुक्यातील 2 तर नागपूर जिल्ह्यातील 4 असे एकुण 279 बाधित पुढे आले आहेत.