वरोरा-
वैनगंगा नदी ला आलेल्या पुरामुळे ब्रम्हपुरी तालुक्यातील अनेक गावे पुरग्रस्त झाली आहेत. तेथील नागरिकांचे अतोनात नुकसान झालेले आहे. अश्याच ब्रम्हपुरी तालुक्यातील पूरग्रस्त पारडगाव व बेटाळा या दोन गावातील नागरिकांना गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली द्वारा करण्यात आलेल्या आव्हानाला प्रतिसाद देत *महारोगी सेवा समिती, वरोरा संचालित आनंद निकेतन महाविद्यालय, आनंदवन* च्या वतीने 60 कुटुंबाना अन्नधान्य किट ज्यात एकूण दहा किराणा वस्तूंचा समावेश होता व कुष्ठबांधवानी निर्मिती केलेले कपडे, चादरी, मास्क व सॅनिटायझर देऊन मदत करण्यात आली.तसेच पारडगाव येथील घरांची पडझड झालेल्या 10 कुटुंबाना प्रत्येकी दहा टिनाचे पत्रे व 20 बल्ल्या महाविद्यालयाच्या वतीने दि. 3 ऑक्टोबर 2020 ला वितरित करण्यात आल्या.
सदर पूरग्रस्तांना मदत करण्याकरिता ने. ही. महाविद्यालयाचे प्रा. डॉ. वाडेकर, बेटाला येथील मुख्याध्यापक श्री विष्णुजी तोंडरे व पारडगाव येथील माजी सरपंच श्री दादाजी ढोरे यांनी समन्वयन केले.पूरग्रस्तांना केलेली ही मदत म.से.स., वरोरा चे सचिव डॉ. विकास आमटे यांच्या प्रेरणेतून तसेच अंतर्गत व्यवस्थापक श्री गौतम करजगी व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शीतल आमटे यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मृणाल काळे व सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आपल्या मासिक वेतनातुन व महारोगी सेवा समिती, वरोरा यांनी एकत्रित रित्या पाऊने चार लाखांचा निधी पूरग्रस्तांनच्या मदतीकरिता उभा केला. या एकत्रित निधीतून पूरग्रस्तांच्या मागणीनुसार आवश्यक साहित्य महाविद्यालया चे प्राचार्य डॉ. मृणाल काळे, उपप्राचार्य प्रा. राधा सवाने यांच्या हस्ते पारडगाव व बेटाला येथील 60 कुटुंबाना वितरित करण्यात आले. याप्रसंगी राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक डॉ रंजना लाड, राष्ट्रीय छात्र सेना प्रमुख प्रा. लता आत्राम, शा. शिक्षण व क्रीडा संचालक प्रा. तानाजी बायस्कर, प्रसाद देवगडे महाविद्यालयाच्या वतीने उपस्थित होते. तसेच गावातील नागरिक सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित होते. गावातील नागरिकांनी ही प्रथमच मिळालेली आवश्यक साहित्यांची मदत आहे असे प्रामुख्याने नमूद केले व आनंदवन परिवाराचे आभार मानले.