ई-कचऱ्याच्या बदल्यात मिळणार ओल्या कचऱ्यापासुन तयार होणारे खत
चंद्रपूर ५ फेब्रुवारी – चंद्रपूर शहर महानगरपालिकेने ई- कचरा व्यवस्थापनाच्या दृष्टीने नाविन्यपुर्ण उपक्रम हाती घेऊन ” रीसायकल यु ” ( RecycleU ) या अँड्रॉइड ॲपची निर्मिती केली आहे. मा. महापौर सौ. राखी संजय कंचर्लावार यांच्या हस्ते ४ फेब्रुवारी रोजी या ॲपचे उदघाटन त्यांच्या कार्यालयात करण्यात आले.
सध्या पर्यावरण संवर्धनासाठी सर्व पातळीवर अनेक उपाययोजना आखल्या जात आहेत. मात्र दिवसेंदिवस पर्यावरणाचे संतुलन बिघडण्यासाठी ई-कचरा मोठ्या प्रमाणात कारणीभूत ठरत आहे, पर्यावरण रक्षणसाठी आता ई-कचऱ्याची विल्हेवाट लावणे आवश्यक असून याबाबत जनजागृती निर्माण होण्याच्या दृष्टीने चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे ” रीसायकल यु ” ( RecycleU ) या अँड्रॉइड ॲप सुरु करण्यात आली आहे.
स्वच्छ भारत अभियानांतर्गत एएसपीएम या चंद्रपूरस्थीत स्वयंसेवी संस्थेने मनपासाठी या ॲपची निर्मिती केली असून आपल्या घरात जाणते-अजाणतेपणी निर्माण होणारा ई कचरा जसे कॉम्प्युटर्सचे मॉनिटर, की-बोर्ड, माऊस, मोबाइलचे खराब झालेले सुटे भाग, बंद पडलेली इलेक्ट्रॉनिक उपकरणे, टेलिव्हिजन, इलेक्ट्रॉनिक खेळणी,घड्याळ, बंद पडलेला रेडिओ, क्षमता संपलेले सेल इत्यादी वस्तु आता मनपा स्वच्छता विभागाला देऊन त्या बदल्यात ओल्या कचऱ्यापासुन तयार होणारे खत मिळविता येणार आहे.
” रीसायकल यु ” ( RecycleU ) ही ॲप आपल्या मोबाईलवर डाऊनलोड करून आपल्या घरातील ई- कचऱ्याचा फोटो यावर द्यावयाचा आहे. या फोटोद्वारे मिळणारे लोकेशन पाहुन मनपा स्वच्छता विभागातर्फे संबंधीत जागेवरून ई- कचरा गोळा केला जाणार आहे. नागरीकांनी यावर फोटो टाकताच त्यांना काही पॉईंट्स देखील मिळणार आहेत. अधिकाधिक पॉईंट्स मिळविणाऱ्या व्यक्तींना प्रोत्साहनपर बक्षिससुद्धा दिल्या जाणार आहे तसेच डिजिटल मार्केटींगच्या दृष्टीने शहरातील जाहीरातदार यावर जाहीरात करू शकणार आहेत. ई- कचरा निर्मुलनाच्या दृष्टीने सर्वानी ” रीसायकल यु ” ( RecycleU ) ॲपचा वापर करण्याचे आवाहन आयुक्त श्री. राजेश मोहिते यांनी केले आहे.
या प्रसंगी सौ. चंद्रकला पंडित सोयाम, श्री.संतोष गर्गेलवार,श्री. दितश कोयचाडे, श्री.नीरज वर्मा, प्रीती बल्लावार, साक्षी कार्लेकर उपस्थीत होते.