नको देवराया अंत असा पाहू….!
कोरोना संकटात अग्नितांडव,घराला भीषण आग,संसार उघड्यावर.
कोरपना (ता.प्र.):-
कोरपना तालुक्यातील गडचांदूर प्रभाग क्रमांक १ येथील रहिवासी “देवराव कल्लूरवार यांच्या घराला आग लागल्याने पदरात असलेला पैसा अडका,दागदागीने,राशन,कपडालत्ता इतर जीवनावश्यक वस्तू आगीच्या भेट चढल्या.सदर घटना १८ एप्रिल रोजी रात्री अंदाजे दीडच्या सुमारास घडली असून रात्रीच्या काळोखात लागलेल्या आगीने क्षणभरातच भीषण रूप धारण करून डोळ्यासमोरच संपूर्ण घर भस्मसात झाले.सदर अग्नितांडवात देवरावच्या संसाराची अक्षरशः राखरांगोळी झाल्याचे विदारक चित्र पहायला मिळत आहे.मागील एक वर्षापासून जीवाला ताप बनलेल्या कोरोना विषाणूने लोकांचे जगणे कठीण केले आहे. आगोदरच कोरोना महामारीत विवीध समस्यांमुळे हैराण झाले असताना घडलेल्या घटनेने देवरावचे कंबरडे मोडले आहे.या घटनेच्या पार्श्वभूमीवर “नको देवराया अंत असा पाहू” म्हटले तर वावगे ठरणार नाही.
देवराव ठेकेदारी पद्धतीने काम करत असून मजुरांना देण्यासाठी ठेवलेली मोठी रक्कम सुद्धा या आगीत जळून भस्म झाली.यांच्या घराच्या भीषण आगीने शेजारी असलेल्या धनंजय चांदेकर यांच्या घराला सुद्धा आपल्या कवेत घेतले.यामुळे त्यांनाही मोठ्याप्रमाणात आर्थिक फटका बसला आहे.सदर आग विझविण्यासाठी प्रभागातील नागरिकांनी अख्खी रात्र एकजुटीने अथक परिश्रम घेतले. माहिती देऊनही अग्निशामक गाडी योग्यवेळी पोहोचू शकली नसल्याची माहिती आहे.सदर घटनेत नुकसानीचा तलाठी यांनी पंचनामा करून शासनाकडे पाठवला असून उध्वस्त झालेल्या या कुटुंबाला शासनाने त्वरित नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी विविध स्तरांतून होत आहे.