Breaking News

मूल येथील कोरोना दक्षता केंद्रावर अपुरे अन् निकृष्ट जेवण!, तात्काळ कंत्राट रद्द

मूल येथील कोरोना दक्षता केंद्रावर अपुरे अन् निकृष्ट जेवण!, तात्काळ कंत्राट रद्द
मूल-
येथील प्रभाग क्रमांक 1 मध्ये असलेल्या कोरोना दक्षता केंद्रावर स्थानिक प्रशासनाकडून बाधितांना चांगले जेवण दिले जायचे. पण जिल्हा प्रशासनाने समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून नवे कंत्राट दिले. मात्र, रविवारी पहिल्याच दिवशी या केंद्रावर बाधितांना अपुरे, निकृष्ट व उशिरा जेवण दिल्याचा प्रकार समोर आला. त्यामुळे बाधितांनी तीव्र रोष व्यक्त केला. या केंद्रावर खुद्द नगराध्यक्ष प्रा. रत्नमाला भोयर यांनी भेट दिली. जेवण बघून त्या संतापल्या आणि त्यांनी कंत्राटदाराची कानउघाडणी केली. अखेर प्रशासकीय अधिकार्‍यांना पाचारण करून तात्काळ कंत्राट रद्द करण्यात आला.
बाधित आढळलेल्या व्यक्तींना विलगीकरण कक्षात ठेवले जाते. त्यांचे जेवण व नास्त्याची व्यवस्था प्रशासनाकडून केली जात आहे. श्रीराम वार्डातील कोरोना दक्षता केंद्रात 122 रूग्ण उपचार घेत आहेत. या आधी या बाधितांना स्थानिक प्रशासनाकडून जेवण दिले जायचे. पण, जिल्हा प्रशासनाने या निर्णयात बदल केला. नव्या कंत्राटदाराची नियुक्ती केली. पण, त्याने पहिल्याच दिवशी बाधितांना नाश्ता दिला नाही. शिवाय जेवणही उशिरा आणले. त्यात ते निकृष्ट असल्याने बाधितांनी प्रचंड रोष व्यक्त करून कंत्राटदाराला धारेवर धरले. त्यामुळे या केंद्रावर काही काळ तणाव निर्माण झाला होता. माहिती मिळताच नगराध्यक्ष प्रा. रत्नमाला भोयर व भाजपा नेते प्रभाकर भोयर यांनी या केंद्रावर भेट दिली. कंत्राटदाराची तुघलकी कारभार बघून त्यांनीही तोंडावर बोट ठेवले. लागलीच तहसिलदार व मुख्याधिकारी यांच्यासह अन्य अधिकार्‍यांना केंद्रावर पाचारण करण्यात आले. जेवण व बाधितांच्या तक्रारी ऐकूण प्रशासकीय अधिकारीही अवाक् झाले. दरम्यान, हा कंत्राट रद्द करून जुन्याच कंत्राटदाराला जेवण देण्याचे आदेश निर्गमित केल्याची माहिती नायब तहसिलदार यशवंत पवार यांनी दिली. उपाशीपोटी असलेल्या बाधितांना मसाला भात देण्यात आला. यावेळी नगर परिषद उपाध्यक्ष नंदकिशोर रणदिवे, सभापती प्रशांत समर्थ यांनीही भेट दिली.
पोटभर जेवण द्या : प्रा. भोयर
कोरोना दक्षता केंद्रावर ग्रामीण भागात नागरिक आहेत. नियमाप्रमाणे सकाळी नाश्ता व पोटभर प्रोटीनयुक्त जेवण द्या. नव्या कंत्राटदाराचे नियोजन चुकले. शिवाय त्यांचा जेवणाचा डब्बाही अगदी छोटा होता. त्यामुळे बाधित संतापले. आपण भेट देवून कंत्राटदारांची कानउघाडणी केली असल्याची प्रतिक्रिया नगराध्यक्ष प्रा. रत्नमाला भोयर यांनी दिली.

About Vishwbharat

Check Also

नागपुरातील मेट्रोचा प्रवास होणार स्वस्त

शाळा, महाविद्यालये आणि इतर शैक्षणिक संस्थाना लागणा-या उन्हाळ्याच्या सुट्ट्या लक्षात घेता महामेट्रोने मेट्रोच्या प्रवासी भाड्यात …

नागपुरातील हिवाळी अधिवेशनात सामान्यांना भोपळा मिळणार काय?

महाराष्ट्रात विदर्भाला जोडण्यासाठी तत्कालीन राज्यकर्त्यांनी 28 सप्टेंबर 1953 ला नागपूर करार केला.त्यानुसार यंदाही नागपुरात हिवाळी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *