चक्रीवादळाचे कोकणात थैमान, महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस
मुंबई-
रौद्र रूप धारण केल्यानंतरर टौकते चक्रीवादाळाने दिशा बदलत, मुंबईला टाळून थेट कोकण किनारपट्टी गाठली. चक्रीवादळाच्या प्रभावामुळे कोकण आणि गोव्यासह रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि अन्य भागांमध्ये थैमान घातले. या सर्वच परिसरांमध्ये 60 ते 70 किमी अशा वेगाने आलेल्या वार्यांनी प्रचंड नुकसान केले आहे. सोलापूर, पुणे, औरंगाबाद, मराठवाड्याचा बहुतांश भाग, नाशिक, सिंधुदुर्ग, गोवा, रायगड, रत्नागिरी, मालवण, राजापूर, जळगाव, अमळनेर, पंढरपूर-मंगळवेढा आदी जिल्ह्यांमध्ये या चक्रीवादळाच्या प्रभावाने वादळी वार्यांसह मुसळधार पाऊस पडला. अनेक ठिकाणी मोठमोठी वृक्षे आणि विजेचे खांब उन्मळून पडली असून, यामुळे वीजपुरवठा खंडित झाला होता.
शनिवारी रात्रीसुद्धा वादळामुळे मुंबई-पुण्यासह संपूर्ण कोकण पट्ट्याला वादळी पावसाने झोडपले होते. आजही या सर्वच भागांमध्ये काही तासांपर्यंत पाऊस झाला. चक्रीवादळाचा धोका लक्षात घेता रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. गोव्याचा पालोलिम समुद्र प्रचंड खवळला होता. रत्नागिरीच्या समुद्रातही मोठमोठ्या लाटा उफाळल्या होत्या. गोवा आणि कोकणच्या परिसरात रात्री उशिरापर्यंत ताशी 70 किमी अशा वेगाने वारे वाहात होते. चक‘ीवादळ जसजसे जवळ येत होते, तसतसे गोवा, सिंधुदुर्ग, मालवण आणि मुंबईच्या समुद्रातील लाटा उंच उफाळून येत होत्या. मालवणच्या समुद्रात तीन मीटर इतक्या उंच लाटा उसळल्या होत्या.
रत्नागिरी जिल्ह्यात थैमान घातल्यानंतरर राजापूर तालुक्यातील जैतापूर, आंबोळगड, साखरीनाटे या गावांमधील अनेक घरांवरी पत्रे उडाली असून, काही कच्च्या घरांचीही पडझड झाली आहे. 70 ते 80 घरांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. उद्या सोमवारीही किनारपट्टी भागांमध्ये वादळी वार्यांसह समुद्र खवळलेला राहील, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
झाड कोसळल्याने दोन बहिणींचा मृत्यू
जळगाव-अमळनेर मार्गावर असलेल्या अचलबाडी येथे मोठे झाड कोसळून दोन लहान बहिणींचा जागीच मृत्यू झाला. वादळाचा तडाखा बसलेल्या सर्वच भागांमध्ये वृक्ष कोसळण्याच्या घटना घडल्या असून, यात अनेक जण जखमीही झाले आहेत. किनारपट्टीच्या भागांमध्ये असलेल्या कोविड केंद्रांमधून कोरोनाबाधितांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे.
अमित शाह-उद्धव ठाकरे यांनी घेतला आढावा
या चक्रीवादळाच्या संकटाच्या पृष्ठभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात आभासी माध्यमातून बैठक झाली. या बैठकीत वादळग्रस्त भागांमधील संपूर्ण स्थितीचा आढावा घेण्यात आला. नागरिकांचे जीव वाचविण्यास प्राधान्य देण्यात यावे. केंद्र सरकारकडून आवश्यक ती मदत तातडीने उपलब्ध केली जाईल, असे अमित शाह यांनी बैठकीत मुख्यमंत्र्यांना सांगितले. राज्याचे मुख्यसचिव सीताराम कुंटे देखील या बैठकीत उपस्थित होते.
