१३ नक्षलवादी ठार, मृत १३ नक्षलवाद्यांवर ६० लाखांचे होते बक्षीस….मोठा शस्त्रसाठा जप्त

गडचिरोलीच्या जंगलात पोलिसांची कारवाई; मोठा शस्त्रसाठा जप्त

गडचिरोली : नक्षलविरोधी मोहिमेअंतर्गत गडचिरोलीच्या जंगलात शुक्रवारी मोठी कारवाई करण्यात आली. उपविभाग एटापल्ली येथील कोटमी हद्दीत शुक्रवारी सकाळी पोलिसांबरोबर उडालेल्या चकमकीत १३ नक्षलवाद्यांना ठार करण्यात आले. मृतांमध्ये विभागीय समिती सदस्य आणि जहाल नक्षलवादी सतीश याच्यासह सहा पुरुष व सात महिलांचा समावेश आहे. घटनास्थळाहून एके ४७ बंदुकीसह मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला.

तेंदूपत्ता हंगामाच्या पार्श्वभूमीवर खंडणी वसूल करण्याच्या उद्देशाने दरवर्षी जंगलात मोठ्या प्रमाणात नक्षलवादी एकत्र येतात. याही वेळी पैडी जंगलात मोठ्या संख्येने कसनसूर व कंपनी क्र. चार दलमचे नक्षलवादी विभागीय समिती सदस्य सतीशच्या नेतृत्वात एकत्र येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. याच माहितीच्या आधारावर गडचिरोली पोलीस लक्ष ठेवून होते. तसेच पैडी जंगल परिसरात पोलीस दलातील सी-६० चे जवान नक्षलविरोधी अभियान राबवत होते. त्याच वेळी ही चकमक झाली. चकमकीनंतर तेरा नक्षलवाद्यांचे मृतदेह आढळले.

६० लाखांचे बक्षीस…

मृत १३ नक्षलवाद्यांवर ६० लाखांचे बक्षीस होते. त्यांची ओळख पटली आहे. यामध्ये नक्षलवाद्यांच्या कंपनी चार दलमचा जहाल नक्षलवादी सतीश ऊर्फ अडवे देवू मोहंदा याच्यावर सोळा लाखांचे बक्षीस होते. कसनसूर दलमची नंदिनी ऊर्फ प्रेमबत्ती  मडावी हिच्यावर सहा लाख, किशोर ऊर्फ शिवा ऊर्फ शिवाजी बारसू गावडे याच्यावर चार लाख, कसनसूर दलमचा उपकमांडर रूपेश ऊर्फ लिंगा मस्तारी गावडे याच्यावर सहा लाख, सेवंती हेडो हिच्यावर दोन लाख, किशोर होळी याच्यावर दोन लाख, क्रांती ऊर्फ मैना ऊर्फ रीना माहो मट्टामी हिच्यावर दोन लाख, गुनी ऊर्फ बुकली धानू हिचामी हिच्यावर चार लाख, रजनी ओडीवर दोन लाख, उमेश परसा याच्यावर सहा लाख, सगुना ऊर्फ वासंती ऊर्फ वत्सला लालू नरोटे हिच्यावर दोन लाख, सोमरी ऊर्फ सुनीता ऊर्फ सविता पापय्या नैताम हिच्यावर सहा लाख, तर रोहित ऊर्फ मनेश ऊर्फ मानस ऊर्फ सोनारू सन्नु कारामी याच्यावर दोन लाखांचे बक्षीस होते.

पोलीस दलाचे कौतुक

गडचिरोली दौऱ्यावर असलेले गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन गडचिरोली पोलीस दलाचे कौतुक केले. वळसे पाटील म्हणाले, छत्तीसगड सीमेवरील नक्षलवादासंबंधी आपले मुख्यमंत्री व शेजारील राज्यातील मुख्यमंत्र्यांशी पत्रव्यवहार करून सीमाभागात नक्षल प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्याबाबत चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनीही सर्व जवानांचे मनापासून अभिनंदन करीत असल्याचे कळवले.

झाले काय?

शुक्रवारी सकाळी जंगलात दबा धरून बसलेल्या ६० ते ७० नक्षलवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. त्या वेळी पोलिसांनी नक्षलवाद्यांना शस्त्र खाली ठेवून आत्मसमर्पण करण्याचे आवाहन केले. मात्र नक्षलवाद्यांनी पुन्हा पोलिसांवर जोरदार हल्ला चढवला. त्याला जवानांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. दीड तास चाललेल्या या चकमकीत पोलिसांचा दबाव वाढल्यानंतर नक्षलवाद्यांनी पळ काढला. चकमकीनंतर जवानांनी शोध अभियान राबवले असता घटनास्थळी १३ नक्षलवाद्यांचे मृतदेह आढळले.

शस्त्रसाठा जप्त…

घटनास्थळाहून एके ४७, एसएलआर, कारबॉईन, ३०३, १२ बोअर इत्यादी रायफल, भरपूर स्फोटके, नक्षलवाद्यांचे साहित्य सापडल्याची माहिती पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी दिली.

पाच महिन्यांत…

गेल्या पाच महिन्यांत या क्षेत्रात एकूण २२ नक्षलवाद्यांना ठार करण्यात आले. १६ मे रोजी गडचिरोली जिल्ह्यातच दोन जहाल नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता.

About Vishwbharat

Check Also

नागपूरकर रसिकांना दोन दिवसीय नाट्य मेजवानी

शुक्रवारपासून महावितरणची राज्यस्तरीय नाट्यस्पर्धा नागपूर, दि. 6 जुलै 2024:- महावितरणच्या आंतर प्रादेशिक विभाग राज्य नाट्य स्पर्धा नागपूर परिमंडलाच्या यजमान …

नागपुरात आणखी ५ दिवस उन्हाचा कहर : पण नागपूर रेल्वे स्थानक…!

नागपूरसह विदर्भात उष्णतेची लाट असून वाढत्या तापमानामुळे लोकांची होरपळ होत आहे. या पार्श्वभूमीवर नागपूर रेल्वे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *