आगीत भस्मसात झाले सारे रंग…!

आगीत भस्मसात झाले सारे रंग…!
वरोडा,
स्व-रक्ताने अपार कष्ट करून रंगवलेल्या चित्रांची राखरांगोळी डोळ्यादेखत होताना बघून एका मनस्वी कलावंताचे हृदय हेलावले. रंग चित्रकार प्रल्हाद ठक यांच्या आर्ट गॅलरीला शनिवार, 5 जूनला पहाटे आगीच्या ज्वाळांनी कवेत घेतले आणि सारे रंग एका क्षणात बेचिराख झाले.

महारांगोळीकार ते लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद असलेले, आनंदवनातील मूकबधिर विद्यालयात कलाशिक्षक म्हणून कार्यरत असलेले प्रल्हाद ठक यांनी स्व-रक्ताने समाजसेवक आणि क्रांतिकारकांचे काढलेले अनेक चित्र डोळ्यात भरण्यासारखे आहेत. याकरिता त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले. पुणे येथील बालगंधर्व ते जे. जे. आर्ट गॅलरीमध्ये त्यांच्या चित्रांच्या प्रदर्शनी या त्यांच्यातील दमदार कलावंताची साक्ष देतात.

रंग कलेचा हा आस्वाद वरोडा शहरातील नवोदित चित्रकारांना पथदर्शी ठरावा म्हणून त्यांनी ठक आर्ट गॅलरी हे दालन आपल्या घरीच हौशी रसिकांकरिता मोकळे केले. त्या ठिकाणी कॅनव्हास पेंटिंग, ऍक्रेलिक पेंटिंग, पोस्टर कलर पेंटिंग इथपासून तर स्वतःच्या रक्ताने कुंचल्याना आकार देत चितारलेले अनेक क्रांतिकारकांचे चित्र हे सर्व आर्ट गॅलरी रसिकांच्या मनाचा ठाव घेत होते. एवढेच नव्हे, तर एखाद्या हौशी कलावंताला कुंचला हातात घेऊन रंग भरावेसे वाटले तर, तिही सोय त्यांनी गॅलरीत केली होती. उभ्या लाकडी स्टँडवर लावलेला कागद, पेंसल्स आणि रंग याची साक्षीदार होते.

मात्र, शनिवारला पहाटे दीड वाजताच्या सुमारास खालच्या मजल्यावरील गॅलरीत धूर निघत असल्याचे त्यांना लक्षात आले. खाली जाऊन बघितले तर अर्धेअधिक चित्रे, रंग आणि रंग कामाचे साहित्य आगीने गिळंकृत केले होते. आग विझविण्याचा आटोकाट प्रयत्न त्यांच्या कुटुंबियांनी केला. मात्र, तोपर्यंत सारेच रंग काळवंडले होते. चित्रांची किंमत, चित्रकाराचे श्रम आणि त्याचे झालेले नुकसान याचे मोल सांगता येणे कठीण आहे, तरी शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीच्या नुकसानीचा अंदाज पंधरा ते 17 लाख रुपये असल्याचा त्यांनी पोलिसात केलेल्या तक्रारीत व्यक्त केला आहे. भिंतीचे रंग उजळतीलही, मात्र स्व रक्ताने रंगविलेले चित्र पुन्हा कसे उभे राहतील, असा प्रश्न प्रल्हाद ठक यांच्यापुढे उभा ठाकला आहे.

About Vishwbharat

Check Also

नागपुरातील हिवाळी अधिवेशनात सामान्यांना भोपळा मिळणार काय?

महाराष्ट्रात विदर्भाला जोडण्यासाठी तत्कालीन राज्यकर्त्यांनी 28 सप्टेंबर 1953 ला नागपूर करार केला.त्यानुसार यंदाही नागपुरात हिवाळी …

नागपुरातील हिवाळी अधिवेशनात पत्रकारांसाठी कॅन्टीन आणि झुणका भाकर केंद्र

नागपुरातील हिवाळी अधिवेशनात पत्रकारांसाठी भव्य व्यासपीठ उभारण्यात आले आहे. पत्रकार ताटकळत उन्हात उभे राहून कार्य …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *