मागील दोन वर्षांपासून रानटी हत्ती व वाघांनी धुमाकूळ घातला असून या वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागत आहे. वनविभाग यावर नियंत्रण मिळवण्यात अपयशी ठरल्याने गडचिरोलीत दहशतीचे वातावरण आहे. याला कारणीभूत वनमंत्री व वनाधिकारी यांच्यावर ३०२ अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी जिल्हा काँग्रेस कमिटीने केली आहे.
गडचिरोली तालुक्यातील हिरापूर व भगवानपूर येथे दोन शेतकऱ्यांना वाघाने ठार केल्याची घटना २४ नोव्हेंबरला उघडकीस आली. त्यानंतर २५ नोव्हेंबरला मरेगावात धानपिकांचे संरक्षण करण्यासाठी गेलेल्या मनोज प्रभाकर येरमे (३८) या शेतकऱ्याला रानटी हत्तीने पायाखाली चिरडून ठार केले. या घटना अतिशय दुर्दैवी आहेत. २६ नोव्हेंबरला काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत गडचिरोली जिल्ह्यातील स्थितीवरून भाजप नेत्यांसह अधिकाऱ्यांवर टीका करण्यात आली. सध्या धान कापणी, मळणीची कामे वेगाने सुरू आहेत. अशावेळी वाघ व हत्तींनी उपद्रव सुरू केलेला आहे. रोज एक बळी जात आहे, अशा परिस्थितीत शासन व प्रशासन मात्र बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप त्यांनी केला.
याबाबत पालकमंत्री, वनमंत्री यांच्यासह वनाधिकाऱ्यांवर गुन्हा नोंदवावा, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी शहराध्यक्ष सतीश विधाते, युवक काँग्रेस प्रदेश सचिव विश्वजीत कोवासे, जिल्हा उपाध्यक्ष समशेरखान पठाण, नेताजी गावतुरे, विनोद लेनगुरे, सहकार सेल अध्यक्ष अब्दुलभाई पंजवाणी, किसान सेल अध्यक्ष वामनराव सावसाकडे, ग्राहक सेल अध्यक्ष भारत येरमे, ओबीसी सेल कार्याध्यक्ष दिवाकर निसार आदी नेते उपस्थित होते.
वनमंत्री आहेत कुठे?
जिल्ह्यात वाघ व हत्तींनी उच्छाद मांडला आहे. शेतकऱ्यांना दहशतीत घराबाहेर पडावे लागत आहे. अशावेळी शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी वनविभागाने कुठलाही पुढाकार घेतला नाही. अद्ययावत ड्रोन कॅमेरे नाहीत, प्रशिक्षित वनकर्मचारी नाहीत. राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार शेजारच्या चंद्रपूर जिल्ह्यात राहतात. पण त्यांनी कधीच गडचिरोलीत येऊन पीडित शेतकऱ्यांच्या घरी भेट दिली नाही आणि वनाधिकाऱ्यांची बैठकही घेतली नाही. त्यामुळे आणखी किती बळी जाण्याची वाट पाहणार आहात, असा सवाल विश्वजीत कोवासे यांनी उपस्थित केला आहे.