विश्व भारत ऑनलाईन :
हृदयविकार जडण्यामागे खराब जीवनशैली व आहाराचे कारण मोठे असते. शरीर शक्य तितके सक्रिय ठेवणे आणि सकस आहार घेणे हे हृदयाच्या आरोग्यासाठी लाभदायक असते. आपल्या नियमित आहारात अक्रोडाचा समावेश केला तर त्यामुळे हृदयाचे आरोग्य चांगले राहते असे तज्ज्ञांनी म्हटले आहे. अक्रोडामुळे हृदयाला धोकादायक आजारांपासून संरक्षण मिळते आणि मृत्यूचा धोका कमी होतो.
जगभरात हृदयाशी संबंधित आजारांमुळे दरवर्षी सुमारे 1.83 कोटी लोक आपला जीव गमावतात. ‘मेडिकल न्यूज टुडे’ च्या माहितीनुसार, अक्रोडात ‘ओमेगा-3’ हे फॅटी अॅसिड, प्रोटिन, फायबर मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे हृदयविकारावर नियंत्रण ठेवता येते.
संशोधनात असे आढळून आले आहे की जे लोक त्यांच्या आहारात अक्रोडाचा समावेश करतात, त्यांचा ‘बीएमआय’ म्हणजेच बॉडी मास इंडेक्स कमी होतो. त्यामुळे त्यांचे हृदयही निरोगी होते. अक्रोडाच्या सेवनाने रक्तदाब नियंत्रित ठेवता येतो, त्यामुळे हार्टअॅटॅकचा धोका कमी होतो. अक्रोडाच्या सेवनाने रक्तातील हाय ट्रायग्लिसराइडची पातळी कमी होऊ शकते.
त्यामुळे हृदयरोग व स्ट्रोकचा धोका घटतो. अक्रोडाचे नियमित सेवन केल्याने कोलेस्टेरॉलची पातळी कमी राहते. अक्रोडात अँटिऑक्सिडंटस्, ओमेगा-3 फॅटी अॅसिड भरपूर असतात. शिवाय अक्रोडातील अल्फा लिनोलेनिक अॅसिड म्हणजेच ‘एएलए’ विशेषतः हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी रोगांपासून संरक्षण करण्यास मदत करते. जर रोजच्या आहारात 1 औंस म्हणजेच 7 अक्रोडांचा समावेश केला तर हृदयाचे आरोग्य चांगले राहू शकते.