पोलीस, पीडब्लूडी मध्ये बदल्यांची दाट शक्यता
विश्व भारत ऑनलाईन :
राज्यातील भारतीय प्रशासकीय सेवेतील 44 आणि भारतीय वन सेवेतील काही अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत.आता वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदली करण्याची प्रक्रिया शासनातर्फे सुरू करण्यात आलेली आहे. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागातही बदली सत्र सुरु होण्याची शक्यता आहे. ३१ ऑक्टोबर २०२० पर्यंत बदली झालेले पोलीस उप आयुक्त, पोलीस अधिक्षक, अपर पोलीस अधिक्षक अशा एकूण ७७ अधिका-यांची यादी तयार करण्यात आली आहे. यादीमधील अधिका-यांकडून पसंतीची तीन ठिकाणे प्राधान्य क्रमानुसार नमुद करुन विनंती अर्ज १९ सप्टेंबरपर्यंत शासनाकडे पाठविण्यास सांगितले होते. विनंती अर्जामध्ये नमुद ठिकाणीच बदली मिळेल की नाही याचा निर्णय प्रशासकीय निकडीनुसार घेण्यात येणार आहे.या अधिकाऱ्यांची नावे चर्चेतबदली होणाऱ्या अधिकाऱ्यांच्या यादीत राज्यातील बड्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या अधिकाऱ्यांमध्ये मुंबईचे अपर पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, अमरावतीच्या पोलीस आयुक्त आरती सिंह, नागपूरचे आयुक्त अमितेश कुमार यांची चर्चा आहे.राज्यातील अनेक पोलीस अधिकाऱ्यांना गृहमंत्र्यांकडून येत्या काही दिवसात बदली मिळण्याची चर्चा आहे.सेवाकाळ पूर्ण झाल्यामुळे अनेक पोलीस अधिकारी आपल्या ट्रान्सफर ऑर्डची वाट बघत आहेत.
वर्षापूर्वी शेवटच्या बदल्यायापूर्वीच्या महाविकास आघाडी सरकारने आपल्या सोईने राज्यातील वरिष्ठ २३ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या १८ सप्टेंबर २०२० रोजी केल्या होत्या. बदली झालेल्यांचा दोन वर्षांचा कालावधी पूर्ण होत असल्याने आता आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या या महिन्यात होण्याची चर्चा सुरु झाली आहे. २०२० नंतर राज्यात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा बदलीचा विषय वादग्रस्त ठरला . बदलीच्या निमित्ताने कोट्यवधींची डील झाल्याचा जोरदार आरोप झाल्याने आणि या आरोपाची केंद्रीय संस्थांकडून कसून चौकशी झाल्याने गेल्या दोन वर्षांत अधिकाऱ्यांच्या बदलीचा विषय टांगणीवर राहिला होता. परिणामी एकाच ठिकाणी नियत मुदतीपेक्षा जास्त कार्यकाळ काम अनेक अधिकाऱ्यांना करावे लागले. वरिष्ठ २३ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या नेमक्या कुठे होणार, हे अद्याप निश्चीत झाले नसले, तरी राज्य सरकारच्या मर्जीतल्या अधिकाऱ्यांना झुकते माप मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.