विश्व भारत ऑनलाईन :
मराठी चित्रपटसृष्टीतील अभ्यासू आणि सामाजिक भान असणारा दिग्दर्शक अशी नागराज मंजुळे यांची ओळख आहे. नागराज मंजुळे यांच्या प्रत्येक चित्रपटात काही ना काही वेगळं पाहायला मिळत असतं. सैराट,फॅन्ड्री ही त्यातीलच काही उदाहरणे आहेत. त्यांच्या प्रत्येक चित्रपटाकडे लोकांचं लक्ष लागून असतं. ‘नाळ’ या गाजलेल्या चित्रपटात नागराज मंजुळे दिसले होते. या चित्रपटातील कथानक आणि बालकलाकारपासून ते सर्व दिग्गज कलाकारांचा अभिनय प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करुन गेला होता. नागराज मंजुळे पुन्हा एकदा लोकांना भुरळ पाडण्यासाठी आणि विचारमग्न करण्यासाठी ‘नाळ 2’ मधून परत येत आहेत. नुकतंच त्यांनी ‘नाळ 2’ ची घोषणा करत चाहत्यांना खुश केलं आहे.
2018 मध्ये ‘नाळ’ हा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटाचं दिग्दर्शन सुधाकर रेड्डी येकांती यांनी केलं होतं. तर नागराज मंजुळे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली होती. इतकंच नव्हे तर नागराज मंजुळे यांनी या चित्रपटात अभिनयसुद्धा केला होता. एका चिमुकल्या मुलाचं भावविश्व सांगणारी ही कथा आहे. यामध्ये चैतन्यची मुख्य भूमिका बालकलाकार श्रीनिवास पोकळे याने साकारली होती. तर नागराज मंजुळे यांनी त्याच्या वडिलांची भूमिका साकारली होती. एका मध्यमवर्गीय कुटुंबाची ही कथा प्रेक्षकांना आणि समीक्षकांना प्रचंड पसंत पडली होती. या चित्रपटाला अनेक मानाचे पुरस्कार मिळाले आहेत. पहिल्या भागाच्या अफाट यशानंतर या चित्रपटाचा दुसरा भाग भेटीला येणार आहे.