अमरावती जिल्ह्यात दुचाकी चोर सक्रिय आहेत. पोलिसही सतर्क झाले आहेत. दुचाकी चोरांची सुळसुळाट झाल्याचे समोर येताच पोलीस आयुक्तालयातील गुन्हे शाखेने सूत्रे हलवत तब्बल ११ मोटरसायकल आरोपींकडून जप्त केले. त्या मूळ मालकाकडे हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सुरू केली. यामुळे अनेक दुचाकी मालकांनी सुटकेचा श्वास सोडत पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक केले आहे.
मंगवारी गस्त घालत असताना पोलिसांना अशी माहिती मिळाली की,दोन व्यक्ती चित्रा चौकात एक चोरी केलेली बाईक घेऊन येत आहेत. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचला. यात आरोपी मोहम्मद अबुजर अब्दुल कलीम, (वय १९, रा. बिस्मील्ला नगर अमरावती) आणि अब्दुल तहसीम अब्दुल फईम, (वय १९, रा. बिस्मीला नगर, अमरावती) यांच्या ताब्यातून चोरीस गेलेली हिरो होंडा स्प्लेंडर मोटर सायकल जप्त केली.
आरोपींना अटक करण्यात आली व त्यांना शहरातील चोरीच्या वाहनांबाबत विचारपूस केली असता त्यांनी अमरावती शहर व नागपूर शहर येथून आणखी काही वाहने चोरी केल्याची कबुली दिली. यावरुन त्यांच्या ताब्यातून एकुण ११ मोटर सायकली (हिरो होंडा स्प्लेंडर) जप्त केल्या. या बाईकची एकूण किंमत ५ लाख ५० हजार व दोन प्रवासी ऑटो (किंमत ८ लाख), असा एकूण १३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. तसेच या प्रकरणातील आरोपीचा एक साथीदार फरार आहे. त्याला ताब्यात घेतल्यानंतर आणखी मोटर सायकलीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.