शिवसेनेसोबत २०१४ मध्ये युती करायला तयार होतो. मात्र अवघ्या चार जागांसाठी शिवसेनेने युती तोडली. युती तोडल्यानंतर ११८ जागांवर लढणारा भाजप एका दिवसात २८८ जागा लढायला तयार झाला. त्याचं एकमेव कारण होते ते म्हणजे अमित शाह. अमित शाह हे आपल्यासोबत होते. दोन महिने अमित शाह महाराष्ट्रात येऊन राहिले. निवडणुकीचे तंत्र त्यांनी आपल्याला शिकवले,असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
आपल्यासोबत शिवसेनेने बेईमानी केली, त्याला छेद देत आणि बेईमानांना त्यांची जागा दाखवत पुन्हा एकदा बाळासाहेबांची शिवसेना तसेच भाजप एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात एकत्र आले याचं श्रेयही अमित शाह यांनाच जाते. या सगळ्या काळात अमित शाह आमच्यासोबत भक्कमपणे उभे होते असंही देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
शिवसेनेने आपल्यासोबत बेईमानी केल्याचा पुनरूच्चार देवेंद्र फडणवीस यांनी केला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावरचच्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा मुंबईत पार पडला. विचार पुष्प असं या पुस्तकाचं नाव आहे. त्यावेळी बोलत असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे वक्तव्य केलं आहे.
२०१४ साली मिळालेले यश मोदीजींचे नेतृत्व आणि अमित शाह यांच्या कर्त्तृत्वामुळे आहे. राजकारणातील चाणक्य ही उपमा याच निवडणुकीमुळे मिळाली. कार्यकर्त्यापासून मोठ्या नेत्यापर्यंत भेटी घेतल्या. गरिबापासून श्रीमतांपर्यंत विचार पोहोचवले. आपण शिवसेनेसोबत युती करायला तयार होतो. चार जागांसाठी शिवसेनेने युती तोडली. ११७ ते ११८ जागा लढणाऱ्या भाजपाने २८८ जागा एका दिवसात लढण्याचा निर्णय घेतला. याच कार्यालयात अमित भाई राहायचे त्यांच्या जोरावर आपण निवडणूक जिंकली असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
अमित शाह यांच्याविषयीचे पुस्तक संग्रही ठेवण्यासारखं
अमित शाह यांच्याविषयी असलेलं पुस्तक संग्रही करून ठेवण्यासारखं आहे. या पुस्तकाचं वैशिष्ट्य हे आहे की कुठलंही पान उघडलं तरीही आपल्या ज्ञानात भर पडते अशीच या पुस्तकाची रचना आहे असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.