अतिवृष्टी, सततच्या पावसाने पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यात आता कापसाचे दर आठ हजार रुपयांपर्यंत खाली आले आहेत. कापसाचे दर कोसळल्याने शेतकर्यांची चिंता वाढू लागली आहे.
उत्पादनात घट आणि त्यात आता दरातही घट झाल्याने कपाशीचा उत्पादन खर्चही भरून निघेल की नाही, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडू लागला आहे.
मागील वर्षी कापसाला विक्रमी भाव मिळाले होते. दहा हजार रुपयांच्यावर क्विंटलमागे कापसाला भाव होते. यंदाही कापसाच्या दरामध्ये तेजी राहील, अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. सुरूवातीला नऊ हजार रुपये प्रती क्विंटलपर्यंत कापसाचे दर होते. पण, मागील काही दिवसांत कापसाच्या भावात मोठी घसरण झाली आहे. कापसाचे दर आठ हजार रुपये प्रती क्विंटलपर्यंत घरसले आहेत. काही बाजार समितीत तर आठ हजारांच्याही खाली कापसाचे दर घसरले आहेत. ७९०० ते ८२०० पर्यंत कापसाचे दर आले आहेत. सद्यस्थितीत कापसाचे घसरलेले दर शेतकर्यांची चिंता वाढविणारे ठरत आहेत.