धुळे जिल्ह्यात बोगस डॉक्टरांकडून रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती आहे. ही गंभीर बाब आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणेने बोगस डॉक्टरांच्या तपासणीसाठी गठित केलेल्या तालुकास्तरीय समिती मार्फत विशेष मोहीम राबवावी, असे निर्देश जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दिले.
आवश्यक तेथे पोलिस दल व अन्न व औषध प्रशासन विभागाची मदत घेवून सांघिकपणे काम करावे. बोगस वैद्यकीय व्यावसायिकांची सुधारित यादी तयार करुन पुढील 15 दिवसांत ठोस कार्यवाही करून अहवाल सादर करावा. तसेच काही संवेदनशील भागात बोगस डॉक्टरांच्या शोधासाठी विशेष कृती दल गठित करण्याची सूचनाही त्यांनी केली. नागरिकांनीही परिसरातील बोगस डॉक्टर व्यवसाय करीत असल्यास जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे तपशील देण्याचे अहवान त्यांनी केले. बोगस वैद्यकीय व्यावसायिकांवर कार्यवाही करण्यासाठी पोलीसांची मदत आवश्यक असल्यास ते उपलब्ध करुन देण्यात येईल. असे अपर पोलीस अधिक्षक काळे यांनी बैठकीत सांगितले. बोगस वैद्यकीय व्यावसायिक शोध मोहिमेबाबत आतापर्यंत केलेल्या कार्यवाहीची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नवले यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिली.