पतसंस्थेचे लेखापरीक्षण करण्यासाठी तीन लाखांच्या लाचेची मागणी करून, त्यापैकी एक लाखाची रक्कम स्वीकारताना विशेष लेखापरीक्षक आणि खासगी लेखापरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी (दि. 20) रंगेहाथ पकडले. नेवासा फाटा येथे लावलेल्या सापळ्यात दोघांना पकडण्यात आले.
जिल्हा विशेष लेखापरीक्षक कार्यालयातील विशेष लेखापरीक्षक किसन दिंगबर सागर (रा. छत्रपती संभाजीनगर) आणि खासगी लेखापरीक्षक तय्यब वजीर पठाण (रा. जवळे खुर्द, ता. नेवासा) अशी दोघा लाचखोरांची नावे आहेत. पतसंस्थेचे लेखापरीक्षण करून चांगला अहवाल तयार करण्यासाठी लाचेची मागणी करण्यात आल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली होती.
संबंधित पतसंस्थेच्या अध्यक्षांनीच ही तक्रार दिली होती. पतसंस्थेचे लेखापरीक्षण करून अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हा उपनिबंधकांनी लेखापरीक्षकांना दिले होते. लेखापरीक्षक किसन सागर याने तक्रारदार व त्यांच्या नातेवाईकांच्या नावावरील मुदत ठेवींची रक्कम व्याजासह अहवालात दर्शविण्यासाठी आणि लेखापरीक्षण अहवाल चांगला सादर करण्यासाठी तीन लाख रुपये लाचेची मागणी केली.