नागपुरातील वर्धा रोडवरील जामठा परिसरात अभियांत्रिकीच्या विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याची घटना बुधवार ४ ऑक्टोबर रोजी समोर आली. याप्रकरणी पीडित विद्यार्थिनीच्या तक्रारीवरून हिंगणा पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. मात्र तीन दिवस होऊनही अजूनही पोलिसांना बलात्काऱ्याचा शोध लागलेला नाही. स्थानिक गुन्हे शाखा, खुफीया पोलिसांसह ३३ पोलिस ठाण्यातील ताफा बलात्काऱ्याचा शोध घेत आहे. जंगल परिसरात सीसीटीव्ही नसल्यामुळे शोध कार्यात अडचणी येत असल्याचे समजते.
झाडाझडतीनंतरही सुगावा लागेना
बलात्कार करणारा लाकुडतोड्या, गुराखी वा बकऱ्या चारणारा असण्याची शक्यता आहे. पोलिसांनी परिसरातील हिस्ट्रीशीटर गुन्हेगार, आपापल्या पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बलात्कारी तसेच इतरही गुन्हेगारांची झाडाझडती सुरू केली आहे. मात्र पोलिसांच्या हाती काहीही लागले नाही. या घटनेची माहिती मिळताच स्वत: पोलिस आयुक्तांनी घटनास्थळी धाव घेत माहिती घेतली होती. पीडितेला जामठा परिसरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पीडितेने विरोध केला असता आरोपीने तिला मारहाण केली.
कुऱ्हाडीचा धाक दाखवून जंगलात नेले
पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार विद्यार्थिनीला एकटी पाहून आरोपीने तिचा पाठलाग सुरू केला. नंतर कुऱ्हाडीचा धाक दाखवून तिच्यावर बलात्कार केला. पीडित विद्यार्थिनी बी. टेक द्वितीय वर्षात शिकत आहे. ती अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वसतिगृहात राहाते. कॉलेजला ५ दिवसांची सुट्टी असल्याने ती तिच्या गावी गेली होती. तिला मंगळवारीच गावावरून कॉलेजला परतायचे होते. पण जवळच्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याने ती थांबली होती. बुधवारी तिला तिच्या भावाने नागपूरला येण्यासाठी बसमध्ये बसवले. जामठा परिसरात आल्यानंतर विद्यार्थिनी बसस्थानकावर उतरली. यानंतर ती पायी कॉलेजला निघाली. त्यावेळी रस्त्याच्या कडेला बसलेल्या एका अनोळखी तरुणाने तिचा पाठलाग करीत तिला अडवले. त्याने कुऱ्हाडीचा धाक दाखवून बळजबरीने जवळच्या जंगलात नेले.
जीवे मारण्याची धमकी
जंगलात जीवे मारण्याची धमकी देऊन आरोपीने तिच्यावर बलात्कार केला. पीडितेवर बलात्कार होत असताना कोणीतरी तिथे पोहोचले. विद्यार्थीनीने आरडाओरड करताच आरोपी पळून गेला. पीडित विद्यार्थिनीने तिच्या एका महाविद्यालयीन मैत्रिणीला घटनेची माहिती दिली. यानंतर कॉलेजचे अधिकारीही पोहोचले. पीडितेला उपचारासाठी जामठा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विद्यार्थिनी घाबरल्यामुळे सुरुवातीला काहीच सांगू शकली नाही. यानंतर सायंकाळी पोलिसांना झालेली घटना सांगितली.