विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूक पार पडणार असून 23 नोव्हेंबरला निवडणुकांचे निकाल लागणार आहेत. रामटेक मतदारसंघात चुरस निर्माण झाली आहे. अपक्ष म्हणून काँग्रेसचे राजेंद्र मूळक रिंगणात उतरले आहेत. तर, विद्यमान आमदार आशिष जैस्वाल यांची चांगलीच दमछाक होत आहे. आधी सहज वाटणारी निवडणूक जैस्वाल यांच्यासाठी दिवसेंदिवस कठीण होत आहे.
राजकीय वर्तुळात अनेक घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत. अनेक पक्षात बंडखोरी करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक यांच्यावर 6 वर्षाची निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. रामटेक विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून विशाल बरबटे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.
मात्र असे असताना अपक्ष उमेदवार म्हणून ते निवडणूकीच्या रिंगणात उतरले आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे भास्कर जाधव यांनी राजेंद्र मुळक यांनी बंडखोरी केल्यावर पक्षाकडून कारवाई का नाही असा सवाल उपस्थित केला होता.
त्यानंतर आता काँग्रेस हायकमांड सोबत चर्चा करून मूळक यांच्यावर तडकाफडकी निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तर, मूळक यांना कन्हान, पारशिवनी, रामटेक, देवलापार परिसरातून नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे.