Breaking News

उद्धव ठाकरे यांची बॅग तपासल्यावरून वातावरण तापले

यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथे सोमवारी शिवसेना (उबाठा) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे जाहीर सभेसाठी आले असताना हेलिपॅडवर उतरताच त्यांच्या ताफ्यातील बॅग तपासण्यात आल्या. उद्धव ठाकरे यांनी येथील सभेत या प्रकारावर टीका करून सत्ताधाऱ्यांच्या बॅगा तपासण्याची हिंमत यंत्रणेने दाखवावी, असे आव्हान दिले. या प्रकारामुळे वणीतील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

 

वणी येथील महाविकास आघाडीतील शिवसेना उबाठाचे उमदेवार संजय देरकर यांच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरे हे सोमवारी दुपारी १ वाजता हेलिकॉप्टरने दाखल झाले. येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात हेलिपॅडवर ते उतरले. यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी उद्धव ठाकरे यांचे स्वागत करत असताना तेथे अचानक काही पोलीस व निवडणूक विभागाचे तपासणी पथक दाखल झाले. त्यांनी उद्धव ठाकरे व त्यांच्या सोबत हेलिकॉप्टरने आलेल्या व्यक्तींच्या बॅगा तपासायच्या असल्याचे सांगितले. या प्रकाराने हेलिपॅडवर काही काळ गोंधळ उडाला. महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी या प्रकाराला विरोध केला. स्वत: उद्धव ठाकरे तपासणी पथकाला हा प्रकार कोणाच्या सांगण्यावरून तुम्ही करत आहात, असा प्रश्न केला. बॅगा सर्वांच्याच तपासता का? , असे त्यांनी विचारले. तपासणी पथकाने हे आपले काम असल्याचे सांगत बॅगा तपासणीस सुरूवात केली. तेव्हा उद्धव ठाकरे यांनी स्वत: या संपूर्ण प्रकाराचे छायाचित्रण केले. या तपासणीत पथकाच्या हाती काही लागले नाही. मात्र यामुळे वणीतील वातावरण चांगलेच तापले आहे.

 

उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात या या बाबीचा खरपूस समाचार घेतला. बॅग तपासण्याच्या या प्रकाराला लोकशाही मानत नाही, असे ठाकरे म्हणाले. यंत्रणेने निवडणूक काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री यांच्या बॅगा तपासायला हव्या की नको, असा प्रश्न करीत हा प्रकार सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्याने चालत असल्याचा आरोप केला.

 

सत्ताधाऱ्यांच्या बॅगा निवडणूक अधिकारी तपासणार नसतील तर महाविकास आघाडीचे कार्यकर्ते तपासतील, असा इशारा त्यांनी यावेळी दिला. त्यावेळी पोलीस, निवडणूक अधिकाऱ्यांनी मधे यायचे नाही, असे ठाकरे म्हणाले. आमच्या बॅगा तपासण्याचा अधिकार जसा तुम्हाला आहे, तसा प्रचाराला जो कोणी येईल, त्याची बॅग तपासण्याचा अधिकार हा मतदाराला आहे आणि तो आम्ही बजावू, असे ते म्हणाले. लोकसभा निवडणुकीत हेलिकॉप्टरमधून सत्ताधाऱ्यांनी प्रचंड बॅगा नेल्या. त्या कपड्याच्या बॅगा असल्याचे सांगितले गेले. पण उन्हाळ्यात एवढे कपडे कोण घालते. या बॅगा यंत्रणेने का तपासल्या नाही, असा प्रश्न त्यांनी केला. तुम्ही आमच्या बॅगा तपासा, आम्ही तुमच्या बॅगा तपासतो, असे ते म्हणाले. जेथे जेथे पथक तुमच्या बॅगा तपासतात, खिसे तपासतात तेथे त्यांचे ओळखपत्र तपासा, त्यांचेही खिसे तपासा, असे आवाहन यावेळी ठाकरे यांनी उपस्थितांना केले.

 

नियमित तपासणी

 

प्रचारासाठी येणाऱ्या प्रत्येक राजकीय व्यक्तीची बॅग तपासली जाते. निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार ही नियमित तपासणी आहे. यातून कोणालाही सूट दिली जात नाही. ही यंत्रणेची जबाबदारी आहे. ते ती पार पाडतात, अशी प्रतिक्रिया वणी पोलीस ठाण्याचे निरीक्षक अनिल बेहराणी यांनी दिली.

About विश्व भारत

Check Also

रामटेकमध्ये आशिष जैस्वाल यांची दमछाक : राजेंद्र मूळक मारणार बाजी?

विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूक पार …

CM के लिए जनता ने इस नेता के नाम पर लगाई मुहर

CM के लिए जनता ने इस नेता के नाम पर लगाई मुहर टेकचंद्र सनोडिया शास्त्री: …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *