वर्धा जिल्ह्यातील आष्टी तालुका हा कांद्याचे कोठार समजला जातो. पण, हे कोठार आता अवकाळी पावसाने चिंब झाले आहे. शेतातील कांदा बुडाला आहे. अवघ्या सात दिवसात कांदा काढणीचे काम सुरू होणार होते. पण, पावसाने होत्याचे नव्हते केले.
आष्टी तालुक्यात लहान आर्वी, आष्टी, तळेगाव या तीन गावात मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादन होते. एकरी दीडशे क्विंटल त्पादन घेतले जाते. या शेतकऱ्यांसाठी हे एक प्रकारचे नगदी पीक ठरते. १५ ते २० फेब्रुवारी दरम्यान लागवड होत असते. मे महिन्यात कापणी होते. आता ती वेळ आली असतांनाच पावसाने घात केल्याचे शेतकरी सांगतात. कांदा जागेवर ११ ते १५ रुपये क्विंटल या भावाने विकल्या जातो. बाहेर बाजारपेठेत अधिक भाव मिळतो. मात्र पावसामुळे कांद्यास मार बसला आणि हा भाव ८ रुपये किलोवर घसरला. कांद्यास माती लागली की दर्जा घसरतो व मग भावही मिळत नाही, अशी व्यथा लहान आर्वी येथील कांदा उत्पादक शेतकरी रुपेश सुखदेवराव खासबागे व्यक्त केली.
या पावसामुळे झालेले नुकसान वर्षभराचे गणित बिघडवून गेल्याचे शेतकरी सांगतात. एकरी ७० हजार रुपये लावणी खर्च येतो. आता ४० टक्के कांदा पिकाचे नुकसान झाले असल्याने लावणी खर्च निघणार कसा ? असा प्रश्न या भागात विचारला जात आहे. फेब्रुवारी ते मे असे हे चार महिन्याचे रोखीचे पीक म्हटल्या जाते. उर्वरित काळात ज्वारी घेत असतात. ज्वारीलाही ढगाळी वातावरण व अवकाळी पावसाचा फटका बसल्याने चिंता वाढली आहे. १९ मे पासून असलेले हे वातावरण शेतकऱ्यांचा घात करणारे ठरले. तीच बाब संत्रा उत्पादकांची. या काळात मृग बहार असतो. त्याची चावच न्यारी, असे म्हणतात. पण अवकाळी पावसाने हा बहार धोक्यात आला आहे. आंबीया बहरात भाव न मिळाल्याने मृगावर आस लावून बसलेले शेतकरी पावसामुळे चिंतेत पडले आहेत. तीच बाब मोसंबी पिकाची. हातात काय पडेल, याची चिंता या भागात आहे.