सायबर चोरट्यांनी ‘महावितरण’चे बनावट संकेतस्थळ तयार करून विविध पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केल्याचे समोर आले आहे. महावितरणने सायबर गुन्हे विभागाकडे तक्रार केली असून, नागरिकांनी अशा बनावट जाहिरातीला बळी न पडण्याचे आवाहन केले आहे.
फसवणुकीच्या उद्देशाने सायबर चोरट्यांनी http://www.mahavitaranmaharashtra.com हे बनावट संकेतस्थळ तयार करून शिपाई, वॉचमन, वाहतूक कामगार व साफसफाई कामगार इत्यादी सुमारे ४,३०० पदांच्या थेट भरतीसाठी अर्ज मागविले आहेत. ‘महावितरण महाराष्ट्र – अधिकृत सेवा’ या शीर्षकांतर्गत जाहिरात प्रसिद्ध करत सातवी आणि १० वी उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांना महावितरणच्या विविध पदांवर थेट भरतीचे आमिष देण्यात आले आहे.
चोरट्यांनी अर्ज करण्यासाठी ‘गुगल फॉर्म’ची सोय केली असून, रविवारी (२५ मे) सायंकाळी पाच वाजेपर्यंत मागासवर्गीय उमेदवारांना ८०० आणि सर्वसामान्य प्रवर्गातील उमेदवारांनी ९०० रुपये शुल्क ‘यूपीआय – क्यूआर कोड’द्वारे भरण्याचे आवाहन केले आहे. अशा कोणत्याही प्रलोभनांना बळी न पडण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.