Breaking News
Oplus_131072

नागपुरात १०० कोटींच्या घोटाळ्यात भाजपच्या बड्या नेत्याचा भाऊ फरार

शालार्थ आयडी घोटाळ्यात नागपुरचे निवृत्त विभागीय शिक्षण उपसंचालक अनिल पारधी, नागपूर विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष व तत्कालीन शिक्षण उपसंचालक चिंतामण वंजारी, छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय शिक्षण मंडळाच्या सचिव व नागपूरच्या तत्कालीन विभागीय शिक्षण उपसंचालक वैशाली जामदार यांना बेड्या ठोकल्यानंतर आता विशेष तपास पथकाच्या (एसआयटी) रडारवर तत्कालीन विभागीय शिक्षण उपसंचालक सतीश मेंढे असल्याची विश्वसनीय माहिती आहे.

सतीश मेंढे हे भाजपाचे भंडारा लोकसभेचे माजी खासदार सुनील मेंढे यांचे सख्खे बंधू आहेत. त्यामुळे या प्रकरणाला नवीन वळण मिळण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे खासदार मेंढे यांच्या अनेक शाळा आहेत. वैशाली जामदार यांच्या अटकेनंतर पीडित शिक्षकांना हिंमत मिळाली असून वर्धेतील एक शिक्षिका तक्रार देण्यासाठी नागपुरात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यानंतर या प्रकरणात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

सतीश मेंढे हे २०१९-२० या काळात नागपूर विभागीय शिक्षण उपसंचालक पदावर कार्यरत होते. घोटाळ्यातील अटकेतील अधिकाऱ्यांची कसून चौकशी केली जात आहे. यानंतर घोटाळ्याला खतपाणी घालणारे काही शिक्षणाधिकारी, शिक्षण संस्थाचालक, मुख्याध्यापक, बोगस शिक्षक आणि मध्यस्थही एसआयटीच्या टप्प्यात असल्याची विश्वसनीय माहिती आहे.

या प्रकरणात २०१९ ते २०२५ पर्यंत तयार करण्यात आलेल्या बनावट शालार्थ आयडीचा तपास केला जात आहे. या घोटाळ्यात माजी उपसंचालक उल्हास नरड यांना गडचिरोलीतून अटक करण्यात आली होती. तीन दिवसांपूर्वी पोलिसांनी लक्ष्मण मंघाम याला अटक केल्यावर दुसऱ्या दिवशी माजी शिक्षण उपसंचालक अनिल पारधी यांना अटक केली. गुरुवारी या प्रकरणात चिंतामण वंजारी यांनाही अटक करण्यात आली.

सायबर पोलिसांनी शालार्थ आयडीचा तपास करून त्यातून कोणाच्या कार्यकाळात किती बनावट आयडी देण्यात आले याचा शोध घेण्यात आला. यात तत्कालीन उपसंचालक वैशाली जामदार आणि माजी सेवानिवृत्त उपसंचालक सतीश मेंढे यांचेही नाव पुढे आले. या माहितीच्या आधारे पोलिसांनी दोघांचेही अटक वॉरंट काढून वैशाली जामदार यांना छत्रपती संभाजीनगरातून अटक केली. मेंढे यांच्या अटकेसाठी पोलिसांचे पथक गुरुवारी भंडारा येथे गेले होते. तिथे मात्र ते नाही.

जामदार यांच्या काळात २११ आयडी

वैशाली जामदार या २०२१ ते २०२३ यादरम्यान नागपुरात उपसंचालक होत्या. त्यांच्या कार्यकाळात २११ बनावट शालार्थ आयडी तयार करण्यात आल्याची माहिती तपासादरम्यान समोर आली आहे. शालार्थ आयडी घोटाळ्यातील आर्थिक उलाढाल तब्बल शंभर कोटींच्यावर असल्याची धक्कादायक माहिती एसआयटीच्या तपासादरम्यान समोर आल्याची माहिती सूत्रांनी दिली. एसआयटीच्या पथकाने या दिशेनेही तपासाला सुरुवात केली असून या आकड्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

About विश्व भारत

Check Also

बम ब्लास्ट की धमकी के बीच गणेश विसर्जन को लेकर पुरे महाराष्ट्रसह मुंबई में अलर्ट

बम ब्लास्ट की धमकी के बीच गणेश विसर्जन को लेकर महाराष्ट्रसह मुंबई में अलर्ट टेकचंद्र …

चोरी करायला गेला अन् पाय मोडून बसला : उंच इमारतीवरून कारवर मारली उडी

चोरी करायला गेला अन् पाय मोडून बसला : उंच इमारतीवरून कारवर मारली उडी “करू गेले …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *