सन २०२६ मध्ये प्रेक्षकांना चित्रपटगृहांमध्ये अनेक बहुप्रतिक्षित चित्रपट पाहायला मिळणार आहेत. या वर्षाच्या पहिल्या दिवशी, दिवंगत दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांचा शेवटचा चित्रपट ‘इक्कीस’ प्रदर्शित झाला. २४ नोव्हेंबरला धर्मेंद्र यांचं निधन झालं. त्यानंतर मोठ्या पडद्यावर त्यांची झलक पाहून चाहते भावुक झाले आहे. पहिल्या दिवशी धर्मेंद्र यांच्या चाहत्यांनी चित्रपट पाहण्यासाठी थिएटरमध्ये गर्दी केली. महत्त्वाचं म्हणजे इक्कीसने रणवीर सिंहच्या धुरंधरला जोरदार टक्कर दिली. इक्कीसने पहिल्या दिवशी किती कलेक्शन केले, ते जाणून घेऊया.
इक्कीस हा चित्रपट २५ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार होता, पण धुरंधर व इतर चित्रपटांशी स्पर्धा नको म्हणून तो १ जानेवारी २०२६ रोजी पुढे ढकलण्यात आला. नवीन वर्षाच्या दिवशी प्रदर्शित झालेल्या इक्कीस या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चांगला प्रतिसाद मिळाला आहे. अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा याने या चित्रपटाद्वारे मोठ्या पडद्यावर पदार्पण केले आहे. पहिल्याच दिवशी त्याचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे.
श्री राम राघवन दिग्दर्शित इक्कीसबद्दल रिलीज आधीपासूनच खूप चर्चा होत होती. त्यातच ही मॅन धर्मेंद्र यांचे निधन झाले. ज्या दिवशी धर्मेंद्र यांचे लूक पोस्टर रिलीज केले, त्याच दिवशी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यामुळे धर्मेंद्र यांचे चाहते त्यांना शेवटचं मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक होते. त्यांच्यासाठी हा चित्रपट आपल्या लाडक्या स्टारला पुन्हा एकदा पाहण्याची संधी होती. ओपनिंग डेला सिनेमाने चांगली कामगिरी केली आहे.
इक्कीसचे पहिल्या दिवसाचे कलेक्शन
अगस्त्य नंदाच्या इक्कीससाठी पहिला दिवस कलेक्शनच्या बाबतीत चांगला ठरला. सॅकनिल्कच्या वृत्तानुसार, इक्कीसने पहिल्या दिवशी सात कोटी रुपयांचे कलेक्शन केले. धर्मेंद्र यांना आदरांजली वाहण्यासाठी प्रेक्षक मोठ्या संख्येने हा चित्रपट पाहण्यासाठी येत आहेत. अनेक चाहत्यांसाठी धर्मेंद्र यांना शेवटचं मोठ्या पडद्यावर पाहणं हा भावुक क्षण होता. इक्कीसची ओपनिंग चांगली झाली आहे, त्यामुळे आता हा चित्रपट वीकेंडला किती कलेक्शन करतो, ते पाहणं महत्त्वाचं ठरेल.
इक्कीस चित्रपटातील कलाकार
इक्कीसमध्ये अगस्त्य नंदा अरुण खेत्रपाल ही भूमिका साकारतोय. त्याच्याबरोबर धर्मेंद्र, जयदीप अहलावत, आद्यांशी कपूर, एकवली खन्ना, सिमर भाटिया, श्री बिश्नोई, सिकंदर खेर हे कलाकार आहेत.
विश्वभारत News Website