अभिनेत्री सनी लिओनी काही दिवसांपूर्वी स्प्लिट्सव्हिला शोमुळे चर्चेत आली होती. एमटीव्हीवर प्रदर्शित होणाऱ्या या शोचे ती सूत्रसंचालन करते. काही दिवसांपूर्वीच या शोचे १६ वे पर्व संपले. तसेच, अभिनेत्री सोशल मीडियावरही सक्रिय असते. आता मात्र, ती कोणत्या शो किंवा तिच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे नाही, तर वेगळ्याच कारणांमुळे चर्चेत आली आहे.
कर्नाटकच्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या (CID)ने एका प्रकरणासंबंधित तिला नोटीस बजावली आहे. कर्नाटक सीआयडी शिवम असोसिएट्स गुंतवणूक घोटाळ्याचा तपास करत आहे. २,४०० कोटींचा घोटाळा या कंपनीने केला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपीने निर्मिती केलेल्या एका चित्रपटासाठी सनी लिओनीला जे मानधन मिळाले, त्याबाबत सीआयडी तिची चौकशी करणार आहे.
शिवम असोसिएट्स व त्याचे मालक शिवानंद नीलन्नवर यांच्याशी संबंधित आर्थिक व्यवहारांची चौकशी सीआयडी करीत आहे. बेकायदा पद्धतीने अनामत रक्कम गुंतवणूक योजनांद्वारे ४०,७०० गुंतवणूकदारांकडून पैसे गोळा केल्याचा आरोप नीलन्नवर यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, नीलन्नवर यांनी २०२३ मध्ये प्रदर्शित झालेल्या चॅम्पियन या कन्नड चित्रपटाची निर्मिती केली होती. सनी लिओनीने या चित्रपटातील ‘डिंगारा बिल्ली नानू’ गाण्यासाठी काम केले होते. या गाण्यासाठी अभिनेत्रीला एक कोटी रुपये मानधन दिल्याचे म्हटले जात आहे. आता तिला हे मानधन कसे मिळाले, याबद्दलची माहिती सीआयडीला तिच्याकडून मिळवायची आहे. तसेच तिला दिलेले पैसे गुंतवणूकदारांच्या निधीतून दिले गेले का, याचीही चौकशी पुढे केली जाणार आहे.
अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, ही नोटीस केवळ आवश्यक चौकशीसाठी आहे आणि त्याचा अर्थ अभिनेत्रीने कोणताही गैरप्रकार केला आहे, असा होत नाही.
काय आहे प्रकरण?
‘शिवम असोसिएट्स’ने ३६% ते ६०% वार्षिक परताव्याचे आश्वासन देऊन कर्नाटक आणि महाराष्ट्रातील ४०,७०० हून अधिक गुंतवणूकदारांची फसवणूक केली. बेकायदा अनामत रक्कम आणि अॅपद्वारे हे पैसे जमा करण्यात आले होते. चालू केलेली ही योजना सुरू ठेवण्यासाठी जुन्या गुंतवणूकदारांना जास्त परतावा देता यावा यासाठी ‘शिवम असोसिएट्स’ नवीन गुंतवणूकदारांकडून मिळालेल्या पैशांचा वापर करीत असे.
दरम्यान, आता अभिनेत्री सनी लिओनी यावर काही प्रतिक्रिया देणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
विश्वभारत News Website