मुंबईतील एका प्रसिद्ध वडापाव विक्रेत्याकडून खाद्यपदार्थ देण्यासाठी वर्तमानपत्राचा वापर केला जात होता. ही बाब निदर्शनात आल्यानंतर भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरण (FSSAI) पश्चिम विभागाने या विक्रेत्यावर कारवाईचा बडगा उगारला. अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केलेल्या या धडक कारवाईमुळे खाद्यपदार्थ विक्रेत्यांमध्ये चांगलीच खळबळ उडाली. या पार्श्वभूमीवर वर्तमानपत्रात गुंडाळलेले खाद्यपदार्थ खाल्ल्याने आरोग्यावर नेमके काय परिणाम होतात, असा प्रश्न सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे, त्याविषयीचा हा आढावा…
तुकाराम मुंढे यांचा कारवाईचा धडाका
अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांचा सध्या चांगलाच बोलबाला पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी वर्धा जिल्ह्यातील गोरस भंडारवर केलेल्या कारवाईनंतर ते चांगलेच प्रकाशझोतात आले होते. मुंबईत बदली झाल्यानंतरही मुंढे यांनी अनेक ठिकाणी छापा टाकण्याचा सपाटाच लावला आहे. यादरम्यान मुंबईतील एका प्रसिद्ध वडापाव विक्रेता वर्तमानपत्रांच्या कागदात खाद्यपदार्थांची विक्री करत असल्याची बाब त्यांच्या निदर्शनात आली. त्यानंतर मुंढे यांनी तातडीने या विक्रेत्यावर कारवाई केली आणि राज्यातील सर्व अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांना रस्त्यावरील वडापाव, समोसा, भजी विक्रेते, हॉटेल्स आणि मिठाई दुकानांवर छापे टाकून वृत्तपत्राचा वापर थांबवण्याचे कडक निर्देश दिले.
वृत्तपत्र आणि अन्नपदार्थांचे धोकादायक नाते
वर्तमानपत्रांच्या छपाईसाठी वापरल्या जाणाऱ्या शाईमध्ये जड धातूंसह अनेक घातक रसायने असतात. गरम, तेलकट किंवा ओलसर अन्नपदार्थांच्या संपर्कात आल्यास ही रसायने अन्नात मिसळू शकतात. याशिवाय, वर्तमानपत्रे अनेकांच्या हाताळणीतून जात असल्याने तसेच अस्वच्छ वातावरणाच्या संपर्कात येत असल्याने त्यांच्यावर रोगकारक सूक्ष्मजीवही असू शकतात. अशा वर्तमानपत्रांचा अन्नपदार्थांसाठी वापर केल्यास ग्राहकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे विक्रेत्यांनी नागरिकांच्या आरोग्याशी खेळू नये, असा इशारा भारतीय अन्न सुरक्षा विभागाने दिला. वडापाव आणि भजी विक्रेते तसेच हॉटेल व्यावसायिक आणि खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी खाद्यपदार्थ बांधून देण्यासाठी अन्नसुरक्षा मानकांनुसार मंजूर केलेले साहित्य वापरावे, असे आवाहनही एफएसएसएआयने केले.
वृत्तपत्रातील घातक रसायने अन्नात कशी मिसळतात?
नवी दिल्लीतील आकाश हेल्थकेअर रुग्णालयातील सूक्ष्मजीवशास्त्र विभागाच्या सल्लागार व संसर्ग नियंत्रण अधिकारी डॉ. दिशा भाटिया यांनी सांगितले की, वर्तमानपत्रांमध्ये वापरल्या जाणाऱ्या शाईमुळे नागरिकांच्या आरोग्याला सर्वात मोठा धोका निर्माण होतो. या शाईमध्ये विविध द्रावके, रंगद्रव्ये, बाइंडर्स आणि विविध रासायनिक घटकांचे मिश्रण असते. तसेच त्यात शिसे, क्रोमियम आणि कॅडमियम यांसारखे घातक जड धातूही असतात. याशिवाय फॅथलेट्स, खनिज तेल आणि विविध कृत्रिम रंगांचाही या शाईमध्ये समावेश असतो. त्यामुळे वडापाव, समोसे, भजी, पकोडे किंवा इतर तळलेले आणि तेलकट पदार्थ वर्तमानपत्रात गुंडाळल्यास नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण होतो. गरम, तेलकट किंवा ओलसर अन्नपदार्थ वर्तमानपत्रात गुंडाळल्यास त्यातील उष्णता आणि तेल हे विद्रावकप्रमाणे काम करतात. त्यामुळे शाईमध्ये असलेली रसायने अन्नात मिसळण्याची प्रक्रिया वेगाने घडते, असेही डॉ. भाटिया यांनी स्पष्ट केले.
वर्तमानपत्रांमधून जीवाणू आणि संसर्गाचाही धोका
डॉ. भाटिया यांच्या मते, सतत अशा दूषित अन्नाचे सेवन केल्यास त्याचे शरीरावर अत्यंत गंभीर परिणाम होऊ शकतात. शिसे आणि इतर जड धातू शरीरात सतत गेल्याने मज्जासंस्था आणि मूत्रपिंडांच्या कार्यावर परिणाम होऊ शकतो. विशेषतः लहान मुलांमध्ये बौद्धिक क्षमतेवर आणि मेंदूच्या विकासावर त्याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते. छपाईच्या शाईत वापरले जाणारे अनेक द्रावके आणि रंगद्रव्ये कर्करोगासारख्या गंभीर आजाराला निमंत्रण देऊ शकतात. अशा रसायनांचा अन्नाद्वारे दीर्घकाळ शरीरात प्रवेश होत राहिल्यास चयापचयाशी संबंधित विकार वाढतात आणि विविध प्रकारच्या कर्करोगांचा धोकाही निर्माण होतो. केवळ रासायनिक घटक हा एकमेव धोका नसून, सूक्ष्मजीवांच्या दृष्टीनेही वर्तमानपत्रे धोकादायक ठरू शकतात. छपाई केंद्रापासून ते वितरण एजंट आणि विक्रेत्यांपर्यंत पोहोचण्याच्या प्रवासात वर्तमानपत्रे अनेक प्रकारच्या पृष्ठभागीय दूषित घटकांच्या संपर्कात येतात. तसेच ती धूळ, प्रदूषण आणि विविध स्वच्छता-अस्वच्छतेच्या परिस्थितींना सामोरी जात असल्याने त्यांच्यावर रोगकारक जीवाणू आणि इतर सूक्ष्मजीव असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अशा वर्तमानपत्रांमध्ये अन्नपदार्थ गुंडाळणे किंवा वाढणे ग्राहकांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते, असा इशाराही डॉ. भाटिया यांनी दिला.
विक्रेत्यांनी वर्तमानपत्रांऐवजी काय वापरावे?
या जीवघेण्या धोक्यापासून वाचण्यासाठी डॉ. भाटिया यांनी विक्रेत्यांना सुरक्षित आणि पर्यावरणपूरक पर्यायांचा वापर करण्याचा सल्ला दिला आहे. फूड-ग्रेड बटर हा पेपर तेलरोधक मानला जातो आणि त्यातील त्यातील रसायने अन्नात विरघळत नाहीत. केळीची स्वच्छ पाने किंवा साळच्या पानांपासून बनवलेल्या पत्रावळी-द्रोण हा एक पारंपरिक, आरोग्यदायी आणि पर्यावरणपूरक पर्याय आहे. उसाच्या चोथ्यापासून तयार केलेल्या पिशव्या खाद्यपदार्थ देण्यासाठी चांगल्या मानल्या जातात. याशिवाय त्या मजबूत, टिकाऊ आणि सहज विघटनशील असतात. अन्नपदार्थ ठेवण्यासाठी विशेष मंजुरी मिळालेले कागदी किंवा कार्डबोर्डचे डबेही चांगली मानली जातात. यादरम्यान सर्व प्रकारचे कागदी साहित्य सुरक्षित असते, असा समज चुकीचा असल्याचा इशाराही डॉ. भाटिया यांनी दिला. काही वेळा पुनर्वापर केलेला कागद सामान्य वर्तमानपत्रांपेक्षाही अधिक धोकादायक ठरू शकतो. कारण या कागदावर पुनर्प्रक्रिया करताना जुनी शाई आणि अनेक प्रकारच्या रासायनिक प्रक्रियांचे अंश त्यात शिल्लक राहिलेले असतात, असे त्या म्हणाल्या. त्यामुळे ग्राहकांच्या आरोग्याच्या सुरक्षेसाठी खाद्यपदार्थांचे पॅकिंग, साठवणूक आणि वाढणी करताना केवळ मान्यताप्राप्त फूड-ग्रेड साहित्याचाच वापर करणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.
विश्वभारत News Website