भाजपचे आमदार कीर्तीकुमार उर्फ बंटी भांगडिया यांचे स्वीय सहायक (पीए) महेश प्रेमळवार यांनी व्यवस्थापन कोट्यातील सफारी बुकिंगसाठी ताडोबा प्रकल्पाचे विभागीय वन अधिकारी सचिन शिंदे यांना ताडोबा पर्यटन माहिती केंद्रातील एका महिला कर्मचारी यांचे फोनवर अतिशय आर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून धमकी दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणाची शिंदे यांनी तक्रार केली असून व्यवस्थापन सफारीच्या जबाबदारीतून मुक्त करावे अशी मागणी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक यांच्याकडे केली आहे.
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात उन्हाळ्याच्या सुटीत पर्यटकांची मोठी गर्दी आहे. त्यामुळे सफारी बुकिंग हाऊसफुल आहे. अतिविशिष्ठ व्यक्तींसाठी तसेच मंत्री, खासदार व आमदार यांच्यासाठी ताडोबा सफारी बुकिंगसाठी व्यवस्थापन कोटा आहे. त्याची जबाबदारी ताडोबाचे विभागीय वन अधिकारी सचिन शिंदे यांच्याकडे आहे. चिमूर विधानसभा मतदार संघाचे भाजपचे आमदार कीर्तीकुमार उर्फ बंटी भांगडिया यांचे स्वीय सहायक महेश प्रेमळवार यांनी ७ मे रोजी व्यवस्थापन कोट्यातील सफारी बुकिंगसाठी ताडोबा पर्यटन माहिती केंद्र येथील एका महिला कर्मचारीला फोन केला.
यावेळी प्रेमळवार आणि महिला कर्मचारी यांच्यात शाब्दिक वाद झाला. तेव्हा प्रेमळवार यांनी महिला कर्मचारी तसेच विभागीय वन अधिकारी सचिन शिंदे यांना फोनवर अतिशय आर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून धमकी देऊन शासकीय कामात अडथळा आणला. या सर्व प्रकारामुळे शिंदे यांच्या नैतिक धैर्यावर मोठा परिणाम झाला असून ते कमालीचे अस्वस्थ झाले आहेत. दरम्यान या प्रकरणाची लेखी तक्रार विभागीय वन अधिकारी सचिन शिंदे यांनी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक डॉ. प्रभुनाथ शुल्का यांच्याकडे केली आहे.
या तक्रारीत शिंदे यांनी आमदार भांगडिया यांचे स्वीय सहायक महेश प्रेमळवार यांचेपासुन जीविताला धोका निर्माण झाला आहे असे वाटत असल्याचे नमूद केले आहे. तेव्हा प्रेमळवार यांचेविरूद्ध कार्यवाही करून त्याबाबत आमदार बंटी भांगडीया यांनाही त्यांचे स्विय सहाय्यक यांचे चुकीच्या वागणुकीची माहिती आपले स्तरावरुन देण्यात यावी अशी विनंती केली आहे. यासोबतच वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प यांना व्यवस्थापन सफारी कोट्यामुळे ताडोबातील सर्वच अधिकारी/कर्मचारी यांना धमकी येणे, त्रास देणे, खोट्या तक्रारी करणे असे प्रकार वाढत आहे असेही निदर्शनास आणून दिले आहे.
जिल्ह्यातील तसेच जिल्ह्याच्या बाहेरून अनेक आमदारांचे स्वयी सहाय्यकांकडून एक गड्डठ्ठा सफारीची मागणी करण्यात येते, ती बेकायदेशीर असल्याने फक्त पर्यटकांनाच सफारी मागण्याचा अधिकार ठेवावा अशीही विनंती केली आहे. प्रेमळवार यांच्या विरोधात तात्काळ कायदेशिर कार्यवाही करावी ही विनंती करतानाच फोनवर धमकी दिलेल्या ऑडीओची रेकॉडींग पाठवलेली आहे. दरम्यान शिंदे या सर्व प्रकारामुळे चांगलेच अस्वस्थ झाले असून त्यांनी व्यवस्थापन कोट्याच्या जबाबदारीतून मुक्त करावे अशीही मागणी केली आहे.
विश्वभारत News Website