गोवरी खाणीत अपघात
– आरसी इमारतीला डंपरची भीषण धडक
– 5 कर्मचारी जखमी
राजुरा-
नादुरूस्त डंपर गाडी दुरूस्तीला नेत असताना वेकोलीच्या आरसी इमारतीवर धडकली. भिंत कोसल्याने या कार्यालयात काम करणारे पाच कर्मचारी जखमी झालेत. ही घटना वेकोलिच्या बल्लारपूर क्षेत्रातील गोवरी-1 खाणीत शुक्रवार, 16 एप्रिल रोजी सकाळी 9 वाजताच्या सुमारास घडली.
या खाणीच्या आरसी कार्यालयालगत डंमर ठेवल्या जाते. शामराव मुसळे नामक कर्मचारी हा डंपर दुरूस्तीला नेत होता. तेव्हा त्याचे या गडावरील नियंत्रण सुटले आणि आरसी कार्यालयाची भिंत तोडून गाडी कार्यालयात घुसली. यावेळी तिथे कार्यरत खाण व्यवस्थापक कौशलेंद्र प्रसाद, प्रभाकर चन्ने, जयप्रकाश महतो, मनिष साखरे हे जखमी झालेत. त्यांना घटना स्थळावरून बाहेर काढताना एका कर्मचार्याच्या पायावर भिंतीचा काही भाग पडल्याने तोही जखमी झाला.जखमी पैकी जयप्रकाश महतो यांना नागपूर येथे, कौशलेंद्र प्रसाद व मनिष साखरे यांना चंद्रपूर येथे, तर अन्य दोघांना वेकोलि बल्लारपूरच्या धोपटाळा येथील रूग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे.
आरसी कार्यालयात वाहनांची नोंद ठेवणे, कर्मचारी हजेरी नोंदी व कामाचे वाटप केले जाते. त्यामुळे इथे नेहमी वर्दळ असते. पण, या दुर्घटनेतून मोठी जीवितहानी टळली असून, वेकोलीच्या सुरक्षा यंत्रणेचा ढिसाळपणा पुन्हा एकदा समोर आला आहे.
