Breaking News

पेरकुंड (चिपाड): (धनगर समाजाच्या बायांची बाळंतपनाची ह्र्द्यस्पर्शी गोष्ट )

Advertisements
(धनगर समाजाच्या बायांची बाळंतपनाची ह्र्द्यस्पर्शी गोष्ट )
 
पेरकुंड (चिपाड)
09 जून ला मी 27 वर्षाचा झालो.मग सहज आई जवळ बसून मी माझ्या जन्माची कथा तिला विचारली.तीने जे माझ्या जन्मा वेळी झालेलं सांगितले.ते डोळ्यात पाणी आणि डोक्यात मुंग्या आणणारे आहे.ते फक्त माझ्या जन्माची किंवा आईची कथा असती.तर फरक पडला नसता.ती तमाम मेंढपाळ व विशेषतः मेंढपाळ स्त्रीला भोगाव्या लागणाऱ्या अनेक वनवासा पैकी एका वनवासाची आहे.आई म्हटली “तु पोटात व्हता तव्हा म्या गावातंच हुती.वाड्यावं (बिऱ्हाड किंवा तांडा) तव्हा बिजा अन दादा असायची (काकू अन काका).कधी मी जायची” मी म्हटलं मंग माझा जन्म कोणत्या दवाखान्यात झाला…….?
आई म्हणाली “तुमा सगळ्याचाच जल्म असाच घरी किंवा वाड्यावं झाला,दवाखानं-बिवाखानं अन तिथं बाळांतंणं आपल्या बायाना नव्हती माहित.अन म्हणून तुया जल्मही बाबाच्या (आजोबाच्या) खोलीत झाला.”
 मी कुठं तरी वाचलं होतं.बाळंतण होतांना शरीरातील 28-29 हाडं मोडतील एवढा त्रास होतो. 
मी लगेंच आईला विचारलं “पेन किलर खायची का”? तिला पेन किलर काय आहे. हे आजही माहिती नाही. “तसांच दम धरत जल्म द्यावा लागंतु….बाईचं बाळांतण म्हणजी इघानंच असतं एक..पण ती आपल्या पोटच्या गोळ्यासाठी समदं भोगती” हे म्हटल्या बरोबर माझ्या पोटात पिळ पडला.साधं खरचटलं की, डेटाॅल, Antiseptic लावणारे आपण.एवढा त्रास झाला तरी तशीच असणारी आई.त्या सोबत येणारा माझा नंतरचा प्रश्न आणि त्यावर आईचं उत्तर. मला हादरवणारं होतं.मी आईला विचारलं“बरं मग नाळ कशी कापली?”
आई म्हटली “बाळंतणाच्या येळी येळवं (वेळेवर) गोंधळ होऊ नाई.म्हणून आपल्या बाया गावरान जवारीची धांडं चिपाडं (पेरकुंडं) जमा करून ठुयाची…म्या बी आशी पेरकुंडं आधीच जमा करून ठुलती. त्या जवारीच्या पेरकुंडानी तुयी नाळ रंभा आत्यानी कापली.”
पुढं ती फक्त बोलत राहिली अन अन इकडं माझं काळीज चिरंत जणू एक विचित्र भावना,  
डोळ्यात आसवाच्या रूपाने तरळंत होती. “कवा कवा एखाद्या बाईला चिपाडं भेटंत नशी.तवा वाड्यावरचा गंजलेल्या इळ्यानी बाया नाळा कापायच्या.पण त्यानी अनेक बायाला अन लेकरांला धनुर्वात व्हायचा.आपल्या (एक नातेवाईक बाई) चं प्वार असंच मेलं.कवा कवा बाई बी मरायची.बाईचा जगणं म्हणजी लय त्रासाचं जगणं.त्यात मेंडकीनींचं तर त्याहून जास्त.लेकरू पोटांत असलं तरी तिला आराम नसतू.डोक्यावं आन कंबरंव तीन तीन तांब्याच्या हंड्या कळशीची आरास इहीरी वरून आणावी लागती.त्यात कवाकवा चार पाच वावरं वलांडून तेवढं पाणी आणावं लागतं. 
इहिरी वं खिलाड्याही नसायच्या. तवा बाया ईहिरी च्या कडंला उभं राहून पाणी काढायच्या. म्हणून बर्‍याच बाया इहिरीत पडून मेल्या.एकदा तर ती (एक नातेवाईक) तिचं 3 महिन्याचं कवळं लेकरू घेऊन पाण्याला आलती. इहिरीवं खिलाडी नव्हती.इहिरीचा काठंही बांधील नवता. मग तिनी दोरानी इहिरीच्या कडनी पाणी काढायला लागली.त्यात पाठीला बांधलेलं कवळं पोर पुढं आलं. अन त्या धक्क्यानी बाईच इहिरीत गेली. आन मग..मेली”. “बाळांतण झालं तरी बाई आराम करायला थांबत नसायची,पाचवी पुजली की बाईनं वाड्यावं निघावं..औषाध-गोळ्यात माईतीच नवत्या.तुमच्या सहा ही भावंडा वेळी असंच झालंय. आपलं मिंढ्या मागच्याच अन त्यातल्या त्यात त्या बायाचं जगणंच इघानाचं अन वनवासाचं हाय वनवास त आपल्या पाचवीला पुजलांय आई पुढं बरंच बोलत होत.  उलांगलेल्या वावरात पळतांना पोटरीत एखादा धसकाट घुसून भळा भळा रक्त यावं.तशी वेदना मला आत होत होती. हे सांगत असतांना तेवढ्यात माझा भाऊ आला.त्याने एक बातमी सांगितली…की 7-8 दिवसाआधी जवळच्याच एका गावातली बाई..वाड्यावं बाळांतीण झाली. अन लगेच मेली. आजही कित्तेक मेंढपाळ वाड्यावर चळखदार पावसाळ्यात, कडाक्याच्या थंडीत किंवा 47-48°c मधे मेंढपाळ स्त्रियांचं बाळंतपण होतं. कित्येकांचे मृत्यू होतात. तर कधी त्यांची बालके मारतातअन हा वनवास आज 21 व्या शतकातही तसाच आहे. आम्ही देशपातळीवर निती आयोगाच्या देखरेखी खाली, शाश्वत विकासाचे गोल ठरवून घेतलेले आहे. त्यानुसार 2030 पर्यंत वेगवेगळ्या 17 गोल्सवर आम्हाला भरीव काम करायचं आहे. 
त्यात 3 रे गोल हे आरोग्या विषयीचं आहे. यामधे MMR ( Maternal mortality rate),
IMR(Infant किंवा child mortality rate) व तत्सम अनेक बाबी आहेत. MMR ( म्हणजे आईचे बाळांतण होताना मरण्याचे प्रमाण लाखावर 130 आहे) तर IMR ( 5 वर्षाखालील मरण्याचे मुलांचे प्रमाण 1000 वर 50 आहे.) 2030 पर्यंत दोन्हीही आपल्याला अनु 70,11 वर आणायचे आहेत. कागदोपत्री आपण ते आणू सुद्धा.पण मला खात्री आहे.
रानात वनात भटकणाऱ्या भटके विमुक्तांच्या,आदिवासी समुहाच्या बायांची व बालकांची अशा प्रकारे होणारी मृत्यू नोंद समावेश नाही सध्याच्या आकडेवारी मधे आहे.
ना ही ती 2030 ला असेल. आणि म्हणून मेंढपाळांचा हा सगळा संघर्ष येथून सुरू होतो.
तो आपल्या वाट्याला येत नसेल तर,निदान समजून घेऊन त्यावर काम केलं पाहिजेंत. भावनिक आणि पक्षाने दिलेल्या आर्थिक पॅकेज वर सामाजिक माध्यमं,टिव्ही मॅनेज करून त्या मधून नको तो कट्टर वाद फैलावून हे प्रश्न कधीच चर्चेला येणार नाहीतहे लिहीतांना माझ्या आईचे शब्द कि बोर्डच्या डिक्शनरीत जसे सजेशन्स म्हणून येत नाहीत.तसंच माझ्या तमाम मेंढपाळ बांधव व बघिनींचा संघर्ष सुद्धा पांढरपेशा समुहाच्या शब्दकोशांत येत नाहीत. पण जसे मी ते शब्द सेव्ह करायला लागलो, तसे ते दिसायला लागले.तसंच मेंढपाळांचा हा संघर्षही मुख्य प्रवाहात रुजवणे हे माझे कर्तव्य राहिल.
‘बेबी शाॅवर-डोहाळे’ यांचे देदीप्यमान सोहळे साजरे करणाऱ्या समुहाला, कदाचित वाड्यावरचा- पालातला हा वरील संघर्ष पुस्तकी व कल्पना रंजनात्मक वाटेल.पण तो तितकाच कडु व भयाण गर्द वास्तव आहे.जेव्हा ह्या वास्तवाचा चटका बसतो.तेव्हा माझ्या सारखा भावनिक,जाती अंध राजकारणाला बळी न पडता. वास्तवावर काम करायला लागतो. माझ्या एका Activist  मैत्रीणीनी मला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतांना असं म्हटली की आपका जनमदिन बिरसा के स्मृतीदिन के दिन आता है. और आपमे मुझे आपके कम्युनिटी के बिरसा दिसते है”
हे तिचं कौतूक खूप जास्त होतं.पण एक मात्र नक्कीच बिरसा मुंडांनी ब्रिटिशां विरोधात आपल्या मुक समुहाच्या जल,जंगल,जमिनीसाठी संघर्ष केला होता.येत्या काळात बिरसांची प्रेरणा घेऊन जल,जंगल,जमिन व उदरनिर्वाहाच्या प्रश्नांवर,मेंढपाळ समुहाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी होईल तितकं करायचं आहे.जेणेकरून कुणाच्या आईला ‘ईळ्यानी किंवा पेरकुंडानी नाळ कापावी लागणार नाही’
 
सौरभ रूखमाबाई गोपाळ हटकर 9604079143
मेंढपाळपुत्र आर्मी खामगांव,जिल्हा बुलढाणा 
Advertisements

About Vishwbharat

Check Also

सद्गुरु जग्गू वासुदेव यांच्या इशा फाऊंडेशनमधून ६ लोक बेपत्ता

आध्यात्मिक सद्गुरु जग्गी वासुदेव यांचा तमिळनाडूमधील कोइम्बतूर याठिकाणी इशा फाऊंडेशन नावाची संस्था आहे. या ठिकाणाहून …

सड़क व भवन निर्माता कंपनियों ने बिना परमिशन के हीं खुदाई करवा दी नागपूर के सुरादेवी की पहाडी? सरकार को करोडों की चपत

सड़क व भवन निर्माता कंपनियों ने बिना परमिशन के हीं खुदाई करवा दी नागपूर के …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *