सेंट अनिस शाळा प्रशासनाविरुद्ध पालकांची तहसीलदारांकडे तक्रार *कारवाई करण्याची केली मागणी
वरोरा :- शहरालगतच्या बोर्डा ग्रामपंचायत क्षेत्रा अंतर्गत येणाऱ्या द्वारका नगरी परिसरात असलेल्या सेंट अनिस हायस्कूल आणि पब्लिक स्कूल या दोन्ही शाळा प्रशासनाविरुद्ध पालकांनी आज मंगळवार दिनांक २९ जून रोजी तहसीलदार प्रशांत बेडसे पाटील यांच्याकडे तक्रार तक्रार केली आहे. त्या तक्रारीतून पालकांनी शुल्कासाठी पालक आणि विद्यार्थ्यांना सतत वेठीस धरणाऱ्या आणि ऑनलाइन सुरू करून त्या शिक्षणापासून विद्यार्थ्यांना वंचित ठेवणाऱ्या शाळा प्रशासनाविरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली आहे.
वरोरा शहरा लगतच्या बोर्डा ग्रामपंचायत क्षेत्रात सेंट अनिस हायस्कूल आणि सेंड अनिस पब्लिक स्कूल या दोन विनाअनुदानित इंग्रजी माध्यमाच्या शाळा आहे. या शाळांमध्ये प्रि प्रायमरी ते दहावीपर्यंतचे वर्ग चालतात.या दोन्ही शाळा व्यवस्थापनाच्या तुलघलकी कार्यपद्धती मुळे चांगल्याच वादग्रस्त ठरल्या आहे. कोरोना महामारी मुळे शैक्षणिक सत्र २०१९-२० मार्च मधेच बंद पडले. तरीही पालकांनी शाळेचे पूर्ण शुल्क भरले.२०२०-२१ या शैक्षणिक वर्षात दोन महिने वगळता प्रत्यक्ष शाळा होऊ शकली नाही. काही प्रमाणात वर्ग नववी आणि दहावी या विद्यार्थ्यांचे वर्ग झाले. इतरांना मात्र कधी नेटवर्क चा तर कधी अन्य कोणतातरी व्यत्यय अशा डोक्यावरून गेलेल्या ऑनलाईन शिक्षणावरच समाधान मानावे लागले. दरम्यान कोरोना महामारी मूळे अनेकांचे रोजगार हिरावले. काहींचा आजारावर आणि ऑनलाइन शिक्षणा करीता अँड्रॉइड मोबाईल व वर्षभराचे रिचार्ज यावर खर्च झाला. अशाही परिस्थिती मध्ये पालकांनी शाळेचे अर्धे शुल्क भरले.आणि इतर ठिकाणच्या शाळा प्रशासनाने दाखविलेल्या माणुसकी प्रमाणे या शाळांनी माणुसकी दाखवून वर्षातील अर्धे शुल्क माफ करावे अशी मागणी केली. परंतु ती धडकवून लावीत पूर्ण शुल्का करिता विध्यार्थी आणि पालकांना वेठीस धरणे सुरूच ठेवले. शासकीय नियमाला वेशीवर टांगून पुस्तके व शालेय साहित्य शाळेतून विकले.
या वर्षीचे शैक्षणिक सत्र २०२१-२३ ला शासकीय आदेशाप्रमाणे दि २८ जून पासून सुरुवात करायची होती. परंतु या शाळांनी शासकीय आदेश पायदळी तुडवित पब्लिक स्कुल ने १४ जून पासून तर हायस्कूल ने दि २१ जून पासून शाळा सुरू केली. आणि त्याच दिवशी पासून ऑनलाइन शिक्षणाला सुरुवात झाली.परंतु सदर शाळांनी या ऑनलाइन शिक्षणापासून पूर्ण शुल्क न भरणाऱ्या विद्यार्थ्यांना वंचीत ठेवुन शिक्षण हक्क कायद्याचा देखील भंग केला आहे. यामुळे संतप्त झालेल्या पालक वर्गाने आज मंगळवार दि २९ जून रोजी तहसीलदार प्रशांत बेडसे पाटील यांच्याकडे निवेदनातून दोन्ही शाळा प्रशासना विरुद्ध तक्रार केली. वेळोवेळी शासकीय आदेश आणि नियमाला पायदळी तुडविणाऱ्या आणि शुल्क न भरणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणापासून वंचित ठेवणाऱ्या शाळा प्रशासनाविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. दरम्यान तहसीलदार प्रशांत बेडसे पाटील यांनी पालकांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे.
