विश्व भारत ऑनलाईन :
शेतकऱ्यांसाठी ई-पीक पाहणीमार्फत नवीन सुविधायुक्त सोपे आणि सुलभ ॲप तयार करण्यात आले आहे. ई-पीक पाहणी मोबाईल ॲपमध्ये काही महत्वाचे बदल करण्यात आले आहेत. आता शेतकऱ्यांसाठी वापरण्यास अत्यंत सोपे व सुलभ मोबाईल व्हर्जन-2 विकसित करण्यात आलं आहे. हे सुधारित मोबाईल ॲप 1 ऑगस्ट 2022 पासून शेतकऱ्यांना वापरासाठी उपलब्ध करुन देण्यात आले आहे. आता ई-पीक करण्याची मुदत 15 ऑक्टोबरपर्यंत वाढविण्यात आली आहे.
ॲपमध्ये नवीन काय?
सुधारित मोबाईल ॲपमध्ये राज्यातील प्रत्येक गटाच्या मध्यबिंदूचे अक्षांश व रेखांश समाविष्ट करण्यात आले आहे. शेतकरी ज्यावेळी पीक पाहणी करताना पिकाचा फोटो घेतील, त्यावेळी छायाचित्र घेण्याच्या ठिकाणापासून त्या गटाच्या मध्यबिंदूपर्यंतचे अंतर आज्ञावलीमध्ये दिसणार आहे. शेतकरी पीक पाहणीसाठी निवडलेल्या गटापासून दूर असल्यास त्यांना त्याबाबतचा संदेश मोबाईल ॲपमध्ये दर्शवण्यात येणार आहे. या सुविधेमुळं पिकाचे अचूक छायाचित्र घेतले किंवा नाही हे निर्धारित करता येणार आहे. शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणीद्वारे नोंदवलेल्या पिकांबाबत आज्ञावलीमध्ये स्वयंघोषणापत्र घेतले जाणार आहे. शेतकऱ्यांनी केलेली ई-पीक पाहणी स्वयंप्रमाणित मानण्यात येऊन, ती गाव नमुना नंबर 12 मध्ये प्रतिबिंबीत होणार आहे.