विश्व भारत ऑनलाईन :
जालना,परभणी,हिंगोली,नांदेड ,लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी नुकसानभरपाईची रक्कम प्राप्त झाली आहे. मात्र, औरंगाबाद आणि बीड जिल्ह्याला नुकसानभरपाईच्या यादीतून वगळण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठा संताप पाहायला मिळत आहे. विशेष औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड, सोयगाव तालुक्यातील अनेक भागात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतजमीन वाहून गेली आहे. पिकांचे नुकसान झाले आहे. असे असतानाही औरंगाबाद व बीड जिल्ह्याला नुकसानभरपाईमधून वगळल्याने शेतकऱ्यांमध्ये रोष आहे.
गुरुवारपासून मिळेल रक्कम?
अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातातून खरीप हंगामा गेला आहे. मराठवाड्यात अतिवृष्टी, पुरासह गोगलगायमुळे तब्बल 10 लाख 81 हजार 761.18 हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे नुकसानभरपाईची मागणी होत होती. दरम्यान सरकराने राज्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागासाठी 3 हजार कोटी रुपयांची घोषणा केली होती. आता मराठवाडा विभागासाठी 1106 कोटी रुपये प्राप्त झाले आहे. तर उद्यापासून म्हणजेच गुरुवारपासून शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होणार आहे.