विश्व भारत ऑनलाईन :
जनतेसमोर वारंवार तहसीलदार अपशब्दांचा वापर करीत असल्याने तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तहसीलदार वरणगावकर जनतेसमोर तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांना अपशब्द बोलतात. यामुळे मानसिक खच्चीकरण होत असून जनतेत तलाठी यांची प्रतिमा मलीन होत आहे.
यासंदर्भात विदर्भ पटवारी संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. नांदेड जिल्ह्यातील माहूर येथून वरणगावकर यांची संग्रामपूर तहसीलदार म्हणून बदली झाली. नेहमीच वादग्रस्त असल्याचे त्यांच्याबाबत बोलले जाते. माहूरला तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांना अपशब्द बोलायचे, असे समजते. अशा अपशब्द बोलणाऱ्या तहसीलदारावर कारवाई होत नाही तोपर्यंत सामूहिक रजेवर जाण्याचा निर्णय पटवारी संघटनेने घेतला आहे. त्यामुळे जनतेची कामे रेंगाळण्याची शक्यता आहे.