राज्यातील विदर्भ वगळता इतर भागात आजदेखील अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्याच्या अधिकांश भागात गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे या भागात जाणवू लागलेली थंडी नाहीशी झाली आहे. दरम्यान, रविवारपासून राज्यात पुन्हा एकदा थंडी जाणवू लागेल, असा अंदाज हवामान अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. विदर्भात मात्र गेल्या तीन दिवसांपासून गुलाबी थंडी नाहीशी होऊन हुडहुडी भरवणारी थंडी आधीच जाणवू लागली आहे. त्यामुळे रात्रीच्यावेळी प्रामुख्याने बांधकाम सुरू असणाऱ्या ठिकाणांवर शेकोट्या दिसू लागल्या आहेत.
राज्यात आजदेखील अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण आहे. प्रामुख्याने मुंबईसह रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव, लातूर या जिल्ह्यांत ढगाळ वातावरणाचा परिणाम अधिक जाणवत आहे. तर उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक जिल्ह्यात मात्र हा परिणाम जाणवणार नाही. काही ठिकाणी आजदेखील पावसाच्या तुरळक सरींची शक्यता आहे. त्यामुळे ढगाळ वातावरण असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये सायंकाळी आणि पहाटेच्या सुमारास जाणवू लागलेल्या थंडीला ‘ब्रेक’ लागला आहे. या जिल्ह्यांमध्ये कमाल आणि किमान तापमानात पुन्हा वाढ झाली आहे. मात्र, रविवारपासून या भागातील ढगाळ वातावरण निवळेल आणि पुन्हा थंडीची सुरुवात होईल, असा अंदाज आहे. थंडीला परतवून लावणारी कोणतीही स्थिती सध्यातरी म्हणजेच किमान नोव्हेंबरअखेरपर्यंत वातावरणात नाही. त्यामुळे थंडी चांगलीच वाढणार आहे. इकडे विदर्भात गेल्या तीन दिवसांपासून हुडहुडी भरवणाऱ्या थंडीला सुरुवात झाली आहे. सायंकाळपासूनच वातावरणात गारवा जाणवू लागला आहे. रात्री ते पहाटेपर्यंत चांगलीच थंडी जाणवत आहे. विदर्भातील जवळजवळ सर्वच जिल्ह्यातील किमान तापमान १४ ते १७ अंश सेल्सिअसदरम्यान आहे. कमाल तापमान देखील ३० ते ३३ अंश सेल्सिअसदरम्यान आहे. त्यामुळे आता ऊबदार कपड्यांची मागणीही वाढू लागली आहे.
अनेक ठिकाणी ऊबदार कपड्यांची दुकाने लागली असून त्याठिकाणी नागरिकांची गर्दीही वाढायला लागली आहे. त्यामुळे आतापर्यंत ग्राहकांकडे नजर लावून बसलेल्या विक्रेत्यांच्या चेहऱ्यावर आता कुठे आनंद दिसू लागला आहे. यात ऊबदार शाल, स्वेटर, मफलर यांची मागणी आहे. या विक्रेत्यांकडे पारंपरिक गरम कपडे मिळत असल्याने त्यातून मिळणारी ऊब पाहता अजूनही लोकांचा कल याच विक्रेत्यांकडे आहे. यंदा उशिराने थंडीला सुरुवात झाली आहे. विदर्भात हुडहुडी भरवणारी थंडी सुरु झाली असून आता संपूर्ण राज्यातच थंडीला सुरुवात होणार असल्याचा हवामान अभ्यासकांचा अंदाज आहे.