विधानसभेचा प्रचार थंडावल्यानंतर काल नागपूरमध्ये राज्याच्ये माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते अनिल देशमुख यांच्या वाहनावर अज्ञात लोकांनी हल्ला केला. या हल्ल्यात देशमुख यांच्या डोक्याला दुखापत झाली. या हल्ल्यानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. विरोधकांनी यासाठी सरकारला जबाबदार धरले आहे. या हल्ल्यानंतर नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी माहिती देताना सांगितले की, सोमवारी रात्री ८ वाजता अनिल देशमुख यांची गाडी नरखेडपासून परत येत असताना गाडीवर दगडफेक झाली. पोलिसांनी ही घटना गांभीर्याने घेतली असून आमचा तपास सुरू आहे. या घटनेनंतर संवेदनशील भागांमध्ये पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.
हर्ष पोद्दार पुढे म्हणाले की, या घटनेचा सखोल तपास करण्यासाठी ज्येष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना कामाला लावले आहे. मी स्वतः घटनास्थळाचा दौरा केला असून तपासावर देखरेख करत आहे. आताच काही निष्कर्ष काढणे योग्य होणार नाही. या घटनेतील तथ्य आम्ही लवकरच समोर आणू. दरम्यान अनिल देशमुख यांच्यावर उपचार करण्यासाठी त्यांना रात्री नागपूरच्या अलेक्सिस (मॅक्स) रुग्णालयात आणले गेले आहे. नागपूरचे पोलीस उपायुक्त राहुल मदाने यांनी सांगितले की, आम्ही रुग्णालय परिसरातही बंदोबस्त वाढविला आहे.
उमेदवार सलील देशमुख यांनी काय सांगितले?
दरम्यान या घटनेनंतर अनिल देशमुख यांचे पूत्र आणि काटोल विधानसभेचे उमेदवार सलील देशमुख यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, अनिल देशमुख यांच्यावर नागपूरच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मी काटोलमध्ये जाऊन कार्यकर्त्यांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. भाजपा प्रत्येक ठिकाणी वाईट पद्धतीने पराभूत होत आहे. त्यामुळेच अशा पद्धतीने हल्ला करून ते लोक संदेश देण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या विरोधात आवाज उचलणाऱ्यांचे डोके फोडले जाईल, असा संदेश यातून दिला जात आहे. काटोल, नरखेडमध्ये अशांतता पसरविण्याचाच हा प्रकार आहे, असाही आरोप सलील देशमुख यांनी केला.
अनिल देशमुख यांच्यावर हल्ला झाल्यानंतरचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेची माहिती कळताच राष्ट्रवादीचे शेकडो कार्यकर्ते रुग्णालयाजवळ एकत्र झाले होते. त्यामुळे तणाव निर्माण झाला होता. भाजपने ही ‘स्टंटबाजी’ आहे, असा आरोप केला. स्वत:च्याच कार्यकर्त्यांकडून देशमुख यांनी दगडफेक घडवून आणली, असा आरोप भाजपचे काटोल मतदार संघाचे प्रभारी अविनाश ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला आहे. काटोलमध्ये सलील देशमुख यांच्याविरुद्ध भाजपचे चरणसिंह ठाकूर यांच्यात अटीतटीची लढत आहे. मतदानाच्या दोन दिवसांपूर्वी ही घटना घडल्याने राजकीय वर्तूळात खळबळ उडाली.