विश्व भारत ऑनलाईन :
जळगाव जिल्ह्यातील चाळीसगावजवळील पाटणा जंगलात चंदनाच्या वृक्षांची कत्तल करणाऱ्या टोळीला पकडण्यासाठी गेलेल्या वन कर्मचाऱ्यांवर हल्ला केल्याची घटना घडली. तस्करांनी वन कर्मचाऱ्यांच्या अंगावर कुऱ्हाड मारुन फेकत गावठी कट्ट्यातून हवेत गोळीबार केला व तेथून पळ काढला. या प्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाटणा जंगलात चंदनाची झाडे तोडणाऱ्या टोळीला हटकणाऱ्या वन विभागाच्या कर्मचाऱ्यांवर चोरट्यांनी हल्ला केल्याचा थरारक प्रकार शुक्रवारी (ता.१६) रात्री घडला. पाटणा वनक्षेत्रात जंगल संवर्धन व संरक्षणासाठी वनरक्षक रहीम तडवी व दैनंदिन संरक्षण मजूर नागो आगीवले, नवशीराम मधे, अशोक आगीवले, रंगनाथ आगीवले, गोरख राठोड, मेघनाथ कैलास चव्हाण यांचे पथक शुक्रवारी (ता.१६) पाटणा परिमंडळातील पाटणा कक्ष क्रमांक ३०३ मध्ये गस्त घालत असताना सायंकाळी सहाच्या सुमारास भिल पायरी/इनाम खोरा भागात पथकाला वृक्षतोड होत असल्याचा आवाज आला.
आवाजाच्या दिशेने गेले असता पाच अनोळखी व्यक्ती चंदन प्रजातीचे वृक्ष करवत व कुऱ्हाडीच्या साहाय्याने चोरी करण्याच्या उद्देशाने कापताना, तोडताना दिसून आले. वन विभागाने त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी वेगवेगळ्या दिशेने पळ काढण्याचा प्रयत्न केला. वनरक्षक रहीम तडवी हे एका तस्कराच्या मागे धावले असता तो टेकडीवर चढला व तेथून त्याने कुऱ्हाड व दगड मारून फेकले. त्यापैकी एक दगड नागो आगीवले यांच्या पायाला लागला.